Tharla Tar Mag Time Slot Change : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील बऱ्याच मालिकांमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ‘मिस्टर अँड मिसेस मुळशी’ ही स्पर्धा सुरू आहे. तर, ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन्ही मालिकांमध्ये सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकांच्या आगामी भागांमध्ये नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता स्टार प्रवाह वाहिनीने एक मोठी अपडेट सर्वांबरोबर शेअर केली आहे. १० फेब्रुवारीपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर महत्त्वाचे बदल करण्यात येतील. याबद्दल जाणून घेऊयात…

गेली दोन वर्षे टीआरपीच्या शर्यतीत ८:३० च्या स्लॉटला अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय ‘स्टार प्रवाह’ने घेतला आहे. १० फेब्रुवारीपासून ‘ठरलं तर मग’ मालिका एका नव्या वेळेत प्रसारित केली जाणार आहे. आता अर्ध्या तासाऐवजी सायली-अर्जुनची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाऊण तास पाहता येणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका १० फेब्रुवारीपासून ८:१५ वाजता प्रसारित केली जाणार आहे. मालिकेची नवीन वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:१५ ते ९:०० अशी असेल.

हृषिकेश-जानकीची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका संध्याकाळी ७.३० ते ८.१५ या वेळेत प्रसारित केली जाईल. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १० फेब्रुवारीपासून या दोन मालिका तब्बल दीड तास प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. याबाबतची अधिकृत पोस्ट ‘स्टार प्रवाह’ने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

तसेच सध्या रात्री ८:०० च्या वेळेत ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रसारित केली जाते. या मालिकेची वेळ वाहिनीकडून बदलण्यात आली असून, ही मालिका आता सायंकाळी प्रसारित केली जाईल. १० फेब्रुवारीपासून ७:३० ते ९:०० असे तब्बल दीड तास ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १० फेब्रुवारीपासून ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना सायली-अर्जुनची लग्नसराई तर, ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ‘मिस्टर अँड मिसेस मुळशी’ ही स्पर्धा पाहायला मिळेल. याशिवाय येत्या आठवड्यात जानकी-हृषिकेशच्या मालिकेत विकी कौशल सुद्धा झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या दोन्ही मालिकांचे ट्रॅक पाहण्यासाठी आतुर आहेत.