Tu Hi Re Maza Mitwa Fame Abhijit Amkar Post : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आजपासून ( २७ ऑक्टोबर ) महत्त्वाचा बदल होणार आहे. यश-कावेरीची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जाईल. तर, अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आजपासून रात्री ८ वाजता प्राइम स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका २३ डिसेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पहिल्या दिवसापासून ही सिरियल रात्री साडेदहाला ऑन एअर होते. मात्र, आजपासून या मालिकेचा रात्री उशिराचा स्लॉट बदलून अर्णव-ईश्वरी आता प्राइम टाइमला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची वेळ बदलल्यावर यामध्ये अर्णवची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अभिजीत आमकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिजीत म्हणाला, “लाइट्स, कॅमेरा आणि प्राइम टाइम…शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद होतोय. मी सर्व रसिक प्रेक्षकांचा खूप-खूप आभारी आहे. तुमचं प्रेम, तुमच्यामुळे मालिकेला मिळालेला TRP…या सगळ्यामुळे हे शक्य झालं आहे. आमचा शो ‘तू ही रे माझा मितवा’ दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतोय आणि आमच्या मालिकेला प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आता रात्री ८ वाजताचा प्राइम स्लॉट मिळाला आहे. आजपासून ( २७ ऑक्टोबर ) आमची मालिका रात्री ८ वाजता नव्या वेळेत नक्की पाहा.”

“तुम्ही दिलेलं प्रेम, प्रशंसा आणि तुम्ही प्रेक्षक मायबाप कायम आमच्या मालिकेच्या पाठिशी राहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. वेळ बदललीये त्यामुळे मालिका पाहायला विसरू नका. ‘तू ही रे माझा मितवा’ रात्री ८ वाजता…!” अशी पोस्ट अभिजीत आमकरने शेअर केली आहे.

दरम्यान, अभिजीतने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच प्राइम टाइम मिळाल्याबद्दल या मालिकेच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. ‘तू ही रे माझा मितवा’मध्ये अभिजीत आमकरसह शर्वरी जोग, आशुतोष गोखले, रुपल नंद, सुरभी भावे, मधुरा जोशी, रुचिरा जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.