Star Pravah Tu Hi Re Maza Mitwa TRP Updates : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारावर ठरवली जाते. सध्या मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत पहिलं स्थान मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या १४ मालिका प्रसारित केल्या जात आहेत. या मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत टॉप-५ मध्ये कोणी बाजी मारली जाणून घेऊयात…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीमधील पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. या पाठोपाठ दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकांचा क्रमांक लागतो. तर, ३.६ रेटिंग्जसह चौथं स्थान रात्री उशिरा प्रसारित होणाऱ्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेने मिळवलं आहे. रात्री उशिरा प्रसारित होऊनही या मालिकेचा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
TRP – ‘स्टार प्रवाह’च्या टॉप-५ मालिका
१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी
३. थोडं तुझं आणि थोडं माझं
४. तू ही रे माझा मितवा
५. येड लागलं प्रेमाचं
‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून अभिजीत आमकरने खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता लिहितो, “तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या आमच्या मालिकेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झालं आहे. तुम्ही आमच्या मालिकेतील प्रत्येक पात्राला आपलंसं करून घेतलंय, त्यामुळेच TRP च्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही कायम तुमचं मनोरंजन करू… तुमचं प्रेम असंच पाठिशी राहूदेत… मालिका पाहत राहा, आशीर्वाद देत राहा आणि आमच्यावर कायम प्रेम करत राहा…’तू ही रे माझा मितवा’ दररोज रात्री साडेदहा वाजता फक्त तुमच्या स्टार प्रवाहवर”
दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २३ डिसेंबर २०२४ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या हिंदी शोची रिमेक आहे.