छोट्या पडद्यावर नेहमीच विविध विषयांवरील मालिका येत असतात. मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. संध्याकाळ झाली की, घरोघरी या मालिका पाहिल्या जातात. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सध्या आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत श्रेयस तळपदे, स्वप्नील जोशी, भरत जाधव अशा मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. अशातच आता आणखी एक लोकप्रिय अभिनेता मालिकांमध्ये पुनरागमन करत आहे.
चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे लवकरच ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या जोडीला ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे. ऐन चाळीशीतला प्राध्यापक अभिमन्यू आणि विशीतला तरुण माही अशा दोन भूमिका सुबोध या मालिकेत साकारणार आहे. एआय ( AI ) च्या माध्यमातून माही म्हणजेच तरुण सुबोध मालिकेत दाखवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात येणार आहे.
‘सोनी मराठी’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती. तेव्हापासून ही मालिका नेमकी केव्हापासून सुरू होणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर नुकत्याच समोर आलेल्या दुसऱ्या प्रोमोद्वारे या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची प्रमुख भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका येत्या ८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या प्रोमोद्वारे वाहिनीने मालिकेचं शीर्षकगीत सुद्धा लॉन्च केलं आहे. नव्याने तू बहरतेस, “नव्याने तू उमगतेस… प्रेमाच्या या वाटेवर, ‘तू भेटशी नव्याने’…” असे या गाण्याचे बोल आहेत.
दरम्यान, ‘तू भेटशी नव्याने’च्या निमित्ताने सुबोध भावे बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये परतला आहे. यापूर्वी सुबोधने प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘तुला पाहरे रे’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता ‘तू भेटशी नव्याने’ ही नवीन मालिका ८ जुलैपासून नेमकी कोणत्या वेळेत प्रसारित केली जाणार याबद्दल लवकरच अधिकृतपणे माहिती देण्यात येईल.