Madhavi Nimkar Second New Home : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नव्या घराची स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. मराठी मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळींनी मुंबई या मायानगरीत हक्काचं घर खरेदी केलं. भाग्यश्री मोटे, अनुजा साठे, मीरा जोशी यांनी नवीन घर घेतलं. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीनंही तिचं मुंबईत दुसरं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे, ही अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मुळे घराघरांत पोहोचलेल्या माधवी निमकरनं मुंबईत हक्काचं दुसरं घर खरेदी केलं असून याबद्दलची खास पोस्ट अभिनेत्रीनं आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

माधवी निमकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. माधवी फिटनेस-फ्रिक आहे, त्यामुळे योगाचे अनेक व्हिडीओही ती सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. अशातच माधवीनं तिच्या मुंबईतल्या दुसऱ्या नव्या घराचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

नव्या घराच्या फोटोसह माधवीनं आनंदी भवानाही व्यक्त केल्या आहेत, घराचे फोटो शेअर करीत माधवी म्हणते, “Work (Dream) In Progress. 2nd Home. तुम्ही मनापासून जे भरपूर प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अर्थात माझ्या आई-वडिलांचेही आशीर्वाद, त्याचं हे फळ.” माधवीचं हे घर अद्याप पूर्ण झालेलं नाही. घराचं काम सुरू असल्याचं तिनं शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे.

माधवी निमकरनं मुंबईत घेतलं दुसरं नवीन घर

दरम्यान, माधवीनं शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंवर गिरिजा प्रभू, आशीष पाटील, भक्ती रत्नपारखी यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.