Sumeet Raghavan Talks About Waghle Ki Duniya : सुमीत राघवन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसह हिंदीतही त्याने आजवर अनेक मालिका, चित्रपटांत काम करत प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. अलीकडेच त्याच्या ‘वागळे की दुनिया’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच नुकतेच अभिनेत्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
सुमीत राघवनची मुख्य भूमिका असलेल्या ‘वागळे की दुनिया’ या मालिकेने जवळपास साडे चार वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अलीकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘सोनी सब’वर प्रसारित होणारी ही एक कौटुंबिक मालिका होती. अनेक जण खूप आवडीने ही मालिका पाहायचे, त्यामुळे मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांनी मालिका का बंद करत आहात, असं विचारल्याचं सुमितने सांगितलं आहे.
‘वागळे की दनिया’बद्दल सुमीत राघवनची प्रतिक्रिया
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सुमीत ‘वागळे की दुनिया’बद्दल म्हणाला, “टीआरपीचे किती मीटर असतील देशात. लोक ठरवतात की कोणता कार्यक्रम चांगला आहे आणि कोणता नाही. जेव्हा ‘वागळे की दुनिया’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला, तेव्हा लोकांनी आम्हाला विचारलं की काय झालं? मालिका बंद का करत आहात? आणि हाच प्रश्न आमचाही होता, पण टीआरपी नव्हता, त्यामुळे मलाही माहीत नाही की हे काय आहे आणि याला किती महत्त्व द्यायला हवं; खरंच महत्त्व दिलं पाहिजे की नाही?”
टीआरपीबद्दल सुमीत राघवनची प्रतिक्रिया
सुमीत राघवन याबद्दल पुढे म्हणाला, “टीआरपी एक खूप भयानक वर्तुळ आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आपण आपल्यापरीने उत्तम काम करायचं आणि बाकी गोष्टी सोडून द्यायच्या.” टीआरपीबद्दल सुमीत पुढे म्हणाला, “तुम्ही कितीही नाही म्हणालात की आम्हाला काही फरक पडत नाही वगैरे, तरी तुम्ही टीआरपीच्या रॅट रेसमध्ये फसता. बुधवारी आणि गुरुवारी आमच्या ग्रुपवरही मेसेज येतात की ‘वागळे की दुनिया’चा ०.७, ०.८ टीआरपी आला, त्यामुळे हे चालत राहतं. ही टेलिव्हिजनबद्दलची वाईट गोष्ट आहे. शेवटी सगळं येऊन टीआरपीपर्यंतच थांबतं.”
दरम्यान, सुमीत राघवन यांच्या ‘वागळे की दुनिया’ या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर फेब्रुवारी २०२१ मध्ये ही मालिका सुरू झालेली. यामध्ये सुमीत राघवन, भारती आचरेकर, अंजन श्रीवास्तव, परिवा प्रांती, चिन्मयी साळवी, सिहान कपाही हे कलाकार झळकले होते. मालिकेतील या वागळे कुटुंबाने खऱ्या आयुष्यातील अनेक कुटुंबांचं मनोरंजन केलं. ९ ऑग्स्ट २०२५ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.