Lagnanantar Hoilach Prem Latest Promo: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत सध्या दिवाळीची लगबग पाहायला मिळतेय. काव्या विक्रम देशमुखांबरोबर घराची सजावट करतेय, तर नंदिनी सासूबाई मानिनीबरोबर मिळून दिवाळीची फराळ बनवतेय. एकूणच देशमुखांच्या घरात दिवाळी आनंदात जाईल, असं चित्र दिसत होतं. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

स्टार प्रवाहने ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत दिवाळीत मानिनीची मैत्रीण सुनीता घरी आल्याचं पाहायला मिळतंय. सुनीता काव्या व जीवाचे कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन आली आहे. त्यामुळे जीवा व काव्याचा भूतकाळ आता सर्वांसमोर येईल का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

प्रोमोची सुरुवात सुनीतापासून होते. ती लॅपटॉपमधून सीसीटीव्ही फुटेज पेन ड्राइव्हमध्ये कॉपी करते आणि म्हणते, “मिळाला पुरावा.” त्यानंतर सुनीता देशमुखांच्या घरी पोहोचते. सजावटीचं कौतुक करत म्हणते, “घराची सजावट खूपच सुंदर केलीयेस मानिनी.” त्यावर काव्याकडे पाहून “माझ्या लक्ष्मीने उजळवलंय हे घर” असं उत्तर मानिनी देते.

हे ऐकताच सुनीता म्हणते, “याच लक्ष्मीने काय दिवे लावलेत तेही बघ. या पेन ड्राइव्हमध्ये काव्या आणि त्या मुलाचा व्हिडीओ आहे. आता तूच बघून ठरव.. कोण खरंय आणि कोण लक्ष्मी आहे ते.” यानंतर लॅपटॉपवर पेन ड्राइव्ह लावण्यात येतो. हे सगळं घडतं तेव्हा सुनीता, मानिनी, काव्या व विक्रम देशमुख हे चारच सदस्य असतात.

पाहा प्रोमो

पेन ड्राइव्हमधील व्हिडीओ पाहून काव्या व जीवाचा भूतकाळ मानिनी व विक्रम देशमुखांसमोर येणार का? की आणखी काही ट्विस्ट येणार? घरातील इतर सदस्यांसमोर दोघांचा भूतकाळ सर्वांना समजेल की मग फक्त मानिनी व विक्रमसमोर जीवा व काव्याचं सत्य उघड होणार, हे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत या आठवड्यात पाहायला मिळेल.

‘आता कुठे चांगलं होत होतं, पन नाही… ह्या काकूला दुसर्‍याच्या आयुष्यात खोडा घालायला आवडतात,’ ‘हिला एवढा काय इंटरेस्ट दाखवलाय काव्यामध्ये काय माहित,’ ‘आता सगळं सुरळीत चालू असताना, ती का हस्तक्षेप करू इच्छिते?’ अशा कमेंट्स या प्रोमोवर पाहायला मिळत आहेत.

netizens comments on Lagnanantar Hoilach Prem promo
लग्नानंतर होईलच प्रेमच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स (सौजन्य- इन्स्टाग्राम)

हा प्रोमो पाहता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत दिवाळीत मोठा धमाका होईल, अशी शक्यता दिसतेय. मालिकेत नेमकं काय घडणार, हे तुम्ही स्टार प्रवाहवर संध्याकाळी ७ वाजता पाहू शकता.