‘झी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका २४ सप्टेंबर २०१७ ते २९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत प्रसारित केली जात होती. या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान, एकदंर त्यांच्या बालपणापासून त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला होता. डॉ. अमोल कोल्हे यांनी या मालिकेत शंभूराजेंची भूमिका साकारली होती. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याबाबत डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका टिव्हीवर प्रसारित केली जायची. मालिकांसाठी रेग्युलेटरी बॉडीकडून काही मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवले जावे, याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखविण्यात आल्याचं डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा ७७२ वा म्हणजेच शेवटचा भाग कसा होता याबद्दल जाणून घेऊयात…

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवटचा भाग कसा होता?

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या शेवटच्या भागाची सुरुवात निवेदनाने होते. “आजचा ३९ दिवस…छळाची परिसीमा झाली, परंतु शंभूराजे औरंगजेबासमोर झुकले नाहीत. शंभूराजे त्या क्रूर छावणीत हत्याराशिवाय, डोळ्यांशिवाय लढत होते. झुंज पराकोटीस भिडली होती पण, शंभूराजेंच्या मनात होता शेवटचा श्वास…त्यांना वाटत होतं शेवटचा श्वास असा असावा की, त्या श्वासोच्छवासाने या महाराष्ट्रभूवर शौर्याचे प्रखर वादळ निर्माण व्हावे. औरंगजेबाच्या अमानुष छळाने शंभूराजेंच्या धैर्याचा भंग झाला नाही… ते अखेरपर्यंत लढले. शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे केले पण, रक्ताचे थेंब ‘हर हर महादेव’ म्हणत ओघळले.”

दुसरीकडे, रायगडावर महाराणी येसूबाई शंभूराजेंची काळजी करत असतात. यानंतर एक मावळा निरोप घेऊन येतो. त्याच्याकडे महाराणी महाराजांची चौकशी करतात. तो म्हणतो, “राणीसाहेब नववर्षाची गुढी उभारता येणार नाही. औरंगजेबाने महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलीये. औरंगजेबाच्या क्रूर शिक्षेला राजे अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे गेले.” हे ऐकून येसूबाईंना धक्का बसतो, संपूर्ण रयत भावुक होते.

यानंतर काही वर्षे पुढे जाऊन, औरंगजेबाच्या मृत्यूचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. औरंगजेब शेवटच्या क्षणाला म्हणतो, “काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह…डाल देते सल्तनत का बोझ उसके कंधे पर”

यादरम्यान प्रेक्षकांना इतिहास सांगण्यासाठी पुन्हा एकदा निवेदन करण्यात येतं. “औरंगजेब आला तेव्हा ५ लाख फौज होती. पण, त्याच्या मृत्यूनंतर रडायला ५ लोकही जवळ नव्हते. ही किमया होती शंभूराजेंच्या लढाऊ बाण्याची…हा लढाऊ बाणा अवघ्या महाराष्ट्राला देऊन छत्रपती संभाजी महाराज अमर झाले. अखेरीस लढवय्या मराठ्यांनी छत्रपती संभाजी राजांचं स्वप्न साकार केलं. औरंगजेबाला भिंगार गावात प्राण सोडायला लावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीसाठी कसं जगायचं हे शिकवलं. अशा या शूर आबांच्या शूर छाव्यास…ज्वलंत, तेजस छत्रपतींना, महाराष्ट्राच्या या महापुरुषास… तमाम महाराष्ट्राचा मानाजा मुजरा…जगदंब!” याच ठिकाणी मालिकेचा शेवट होतो.

एकंदर मालिकेच्या शेवटच्या भागात औरंगजेबाने महाराजांवर अत्याचार करण्याचं जे-जे फर्मान सोडलं होतं, ते ऐकायला मिळतं आणि त्याचं प्रतिकात्मक चित्रण दाखवण्यात आलं आहे. शेवटी सगळे कलाकार छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील समाधीचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळतंय.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आजच्या व्हिडीओमध्ये नमूद केल्याप्रमाणे, टेलिव्हिजन वाहिन्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांनी शेवटच्या भागात सर्वाधिक भर निवेदनावर दिला आहे. हिंसाचार, रक्त किती प्रमाणात दाखवलं जावं या गोष्टी नियमात बसतील अशा पद्धतीनेच मांडण्यात आल्या आहेत.

याबद्दल अमोल कोल्हे सांगतात, “टीव्हीवर रक्त दाखवण्यासाठी तुम्हाला विविध माध्यमांची परवानगी घ्यावी लागते त्याला काही निर्बंध असतात. स्टॅण्डर्ड्स अँड प्रॅक्टिसेसकडून गाईडलाईन्स दिल्या जातात. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट, टेलिकॉम रेग्युलेटरी ओथोरिटी , बीसीसीसी या माध्यमातून त्यावर निर्बंध घातलेले असतात. त्यामुळे निश्चितच आम्हाला ते दाखवण्यासाठी या माध्यमांचा दबाव होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ७७२ व्या भागानंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने २९ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला.