TMKOC Fame actor on Dayaben aka Disha Vakani: काही कलाकारांमुळे काही भूमिका दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. एखादी भूमिका म्हणजे अमुक एखादा कलाकार, असे समीकरण पक्के असते.

अभिनेत्री दिशा वकानीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ या मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने गरोदरपणात काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण, दिशा लवकरच परत येणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, दिशा अद्याप शोमध्ये परत आलेली नाही.

त्यामुळे दिशा या मालिकेत पुन्हा कधी येणार आणि दयाबेनच्या भूमिकेत आणखी एखादा कलाकार दिसणार का, याची चर्चा सतत होताना दिसत आहे. तसेच, मालिकेतील कलाकारांना दिशा कधी परतणार, असाही प्रश्न विचारला जातो.

“त्यांची मुले त्यांची प्राथमिकता…”

आता मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया याने नुकत्याच ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे. दयाबेन आणि जेठालाल यांचे सीन प्रचंड गाजले होते. सेटवर त्यांच्या सीनची कधी आठवण काढली जाते का? यावर अभिनेता म्हणाला, “एक प्रेक्षक म्हणून दया आणि जेठालाल यांच्या सीन्सची मला आठवण येते. त्यांच्यातील ते बॉण्डिंग, संवाद यांची आठवण येते.”

अभिनेता म्हणाला, “दयाबेन मालिकेत पुन्हा लवकर आली पाहिजे, असे तुमच्यासारखेच आम्हालाही वाटते. त्यांच्यामुळे शोची शान वाढावी, असे आम्हालाही वाटते. पण, त्यांचे खासगी आयुष्य आहे. त्यांची मुले त्यांची प्राथमिकता आहे, त्यांना वाढवायचे आहे. पण, दिलीपसर इतके सक्षम आहेत की, दयाबेनशिवायही ते संपूर्ण सीन उत्तम करतात.”

“विचार करा की, तुमच्याबरोबर तुमचा पार्टनर नाही. पण, तरीही तुम्हाला सीन करायचा आहे. तुम्हाला लोकांना हसवायचं आहे. तर ते खूप उत्तम काम करत आहेत. ते खूप उत्तम अभिनेते आहेत, यात काही शंकाच नाही.”

दिलीप जोशी यांनी या मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारली आहे. गेली १७ वर्षे ते या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांना ते खळखळून हसवताना दिसत आहेत. त्यांच्या अनेक संवादांचे मिम्सदेखील बनताना दिसतात. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील जेठालाल हे लोकप्रिय पात्र आहे.

दरम्यान, अभिनेता असेही म्हणाला की, ऑफस्क्रीन सर्वांचे एकमेकांशी चांगले नाते आहे. जे नवीन कलाकार मालिकेत आले आहेत, त्यांच्याशीदेखील चांगले संबंध असल्याचे अभिनेत्याने म्हटले.