‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका गेली १६ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलीय. मग ती भूमिका जेठालाल, दयाबेन असो किंवा आत्माराम भिडे आणि तारक मेहता असो. सगळीच पात्र चाहत्यांना अजूनही आपलीशी वाटतात. या १६ वर्षांच्या प्रवासात अनेक नवीन कलाकार मालिकेत आले, तर काही कलाकारांनी कायमचा निरोप घेतला.

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेत डॉक्टर हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचं ९ जुलै २०१८ रोजी ह्रदयविकाराने दु:खद निधन झालं. यामुळे मालिकेतील सहकलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आज (१२ मे रोजी) याच हरहुन्नरी कलाकाराचा वाढदिवस आहे.

हेही वाचा… “लहान बहिणीला मारायचा…”, कुशल बद्रिकेच्या आईने सांगितली त्याच्या बालपणीची आठवण, म्हणाल्या…

आपल्या मित्राची आठवण शेअर करत ‘तारक मेहता का उलटा चश्मा’मधील आत्माराम भिडेचं पात्र साकारणार्‍या मंदार चांदवडकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. मंदार यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चाचाजी आणि हाथी यांचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत मंदार यांनी लिहिलं, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आझाद. माझ्या बारीक मित्रा, तुझी खूप आठवण येते. मला खात्री आहे की तू जिथे कुठे असशील तिथे आनंद वाटत असशील.”

मंदार चांदवडकर पुढे म्हणाले, “हा व्हिडीओ मी रेकॉर्ड केलाय. शूट चालू असताना ही अशी मजामस्ती सुरू होती. तुम्ही बघू शकता की, आमचे चंपक चाचाजी त्याला त्रास देतायत, पण तो हसून त्यावर प्रतिक्रिया देतोय. मी तेव्हा आझादला विचारलं की, जेव्हा अमित (चंपक चाचाजी) तुला त्रास देतो तेव्हा तुला राग नाही येत का? तेव्हा आझादने हसत सांगितलं, मला अजिबात राग येत नाही. मी त्याला काहीच नाही करणार, फक्त एक दिवस मी त्याच्यावर बसेन.”

हेही वाचा… “बाबा आता असता तर…”, सखी गोखलेने व्यक्त केल्या वडिलांबद्दलच्या भावना, म्हणाली…

मंदार चांदवडकरांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आम्हाला अजूनही डॉक्टर हाथींची आठवण येते”, अशाप्रकारच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत; तर काही जणांनी आझादजींना वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेद्वारे मंदार चांदवडकर अजूनही प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. या मालिकेत दिलीप जोशी, सचिन श्रॉफ, सुनयना फोजदार, तनुज महाशब्दे, मुनमुन दत्ता, सोनालिका जोशी, श्याम पाठक अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.