Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actress: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय मालिका गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या विनोदी कार्यक्रमाचा आणि यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे.
‘तारक मेहता..’ फेम सोनू काय म्हणाली?
या मालिकेतील जेठालाल, भिडे मास्तर, माधवी भाभी, अय्यर, बबीताजी, पोपटलाल याबरोबरच टप्पू सेना अशी सगळीच पात्रे लोकप्रिय ठरली आहेत. असे असले तरी आतापर्यंत अनेक कलाकारांनी मालिका सोडल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्री निधी भानुशाली तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ मालिकेत सोनू ही भूमिका साकारली होती.
आता अभिनेत्रीने सात वर्षे मालिकेत काम केल्यानंतर मालिका का सोडली यावर वक्तव्य केले आहे. न्यूज १८ ला नुकतीच तिने मुलाखत दिली. या मुलाखतीत निधी म्हणाली की सात वर्षे मालिकेत केल्यानंतर ती मालिका सोडण्याचा निर्णय घाईघाईत घेतला नव्हता. मला त्यावेळी वाटले की तो शो सोडण्याची ती योग्य वेळ आहे. कारण मला इतर गोष्टीही करायच्या होत्या.
या शोमध्ये काम करण्याचा अनुभव हा माझ्या आयुष्यातील सर्वात समृद्ध अनुभवांपैकी एक होता. परंतु मला इतर बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. मला अधिक अभ्यास करायचा होता, प्रवास करायचा होता आणि जीवनाचा अनुभव आणखी थोड्या वेगळ्या प्रकारे घ्यायचा होता. पण १२ तासांच्या शूटिंगमुळे हे सगळं शक्य होत नाही.”
जर निर्मात्यांनी तिला परत येण्यासाठी संपर्क साधला तर ती पुन्हा मालिकेत काम करेल का? यावर अभिनेत्री म्हणाली, “जर मी पुन्हा ती भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला तर ज्या कारणासाठी मी मालिका सोडली होती, तो उद्देश मागे राहील. एका पात्राच्या चौकटीबाहेर स्वतःला शोधण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात होती. माझ्या मनात शोबद्दल खूप प्रेम आणि कृतज्ञता आहे. पण, आता मला वेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे.”
निधी असेही म्हणाली की तिने जरी मालिका सोडली असली तरी मालिकेतील कलाकारांबरोबर तिचे आजही चांगले बॉण्डिंग आहे. ती वेळ मिळेल तसा इतर कलाकारांना भेटण्याचा प्रयत्न करते.
दरम्यान, निधीने चित्रपट, टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया प्रॉडक्शनमध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली आहे. तसेच अभिनयाबरोबर तिला संगीताचीदेखील आवड आहे.