Tanvi Mundle Talks About Shashank Ketkar : तन्वी मुंडले मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘झी मराठी’वरील ‘पाहिले न मी तुला ही’ तिची पहिलीवहिली मालिका. त्यामध्ये तिने नायिकेची भूमिका साकारलेली. त्या मालिकेमध्ये अभिनेता शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी हे कलाकार तिच्यासह महत्त्वपूर्ण भूमिकांत होते. अशातच आता तिने शशांकबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितलं आहे.

तन्वी मुंडले ही मूळची कोकणातली. परंतु, अभिनय क्षेत्रामुळे आता ती मुंबईत स्थायिक झाली आहे. तन्वीने आजवर मालिकांमध्ये नायिकेची भूमिका साकारली असून, सध्या ती संकर्षण कऱ्हाडेबरोबर ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकात काम करीत आहे. नुकतीच तिने लोकप्रिय अभिनेत्री सुलेखा तळवलकरला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने तिच्या पहिल्या मालिकेचा अनुभव सांगितला आहे.

तन्वी मुंडलेची शशांक केतकरबद्दल प्रतिक्रिया

सुलेखा यांनी तिला “सहकलाकारांबद्दल काय सांगशील? पहिल्या मालिकेत शशांक केतकरसारखा अतिशय गुणी कलाकार आणि आशय कुलकर्णीसारखा मस्तीखो कलाकार लाभले; तर हे लोक सेटवर तुला त्रास द्यायचे का,” असा प्रश्न विचारला. त्यावर तन्वी म्हणाली, “मजाच. मी तेव्हा सेटवर सगळ्यात लहान होते. त्यामुळे ते माझी खूप मस्करी करायचे. काही झालं तरी हिला छळा, हिला त्रास द्या; पण मीही मजा करायचे तेव्हा.”

तन्वी पुढे शशांकबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत म्हणाली, “शशांक केतकर म्हणजे मलाच दडपण आलं होतं तेव्हा. कारण- होणार सून मी ह्या घरची ही त्याची मालिका मी पाहिली होती, जेव्हा माझा या क्षेत्राशी काही संबंध नव्हता. त्यानंतर माझी पहिलीच मालिका, ज्यामध्ये तोच आहे. त्यामुळे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती आणि तेव्हा मला कळत नव्हतं की, त्याला काय म्हणू शशांकसर म्हणू की काय म्हणू. कारण- सर म्हटलं की, दबून राहू वगैरे; मग कसं काम करणार? पण, तो खूप छान आहे आणि त्यामुळे मला दडपण नाही आलं. त्यात पहिलीच मालिका आणि आपणच त्यात नायिका आहोत. अशी सगळी ओझी होती डोक्यावर.”

तन्वी पुढे आशय कुलकर्णीबद्दल म्हणाली, “छान आहेत दोघेही. तो खूप खवय्या आहे. शशांक आणि तो दोघेही खूप छान जेवण बनवतात. दोघांनी सेटवर खूप छान वातावरण ठेवलं होतं. तेव्हा कोविड सुरू झाल्यानंतर २४ तास आम्ही एकत्रच असायचो आणि तेव्हा आमची खूप छान मैत्री झाली. खूप छान होता तो अनुभव.”