Tejashri Pradhan On Goddess Mahagauri: अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत अभिनेत्रीने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. तिच्याबरोबर सुबोध भावेदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी समर ही भूमिका साकारली आहे.

स्वानंदी आणि समर यांच्यात सध्या गैरसमज होताना दिसत आहे. दोघेही सतत एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. आता या दोघांमधील मतभेद कधी दूर होणार आणि त्याच्यांत मैत्री होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली…

आता तेजश्री प्रधान तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने नुकतीच मराठी मनोरंजन ऑफशिअलशी संवाद साधला. त्यावेळी नवरात्रीच्या निमित्ताने तिच्या आयुष्यातील भावनिक आणि प्रेरणादायी बाजूबद्दल वक्तव्य केले.

तेजश्री म्हणाली, “मी महागौरी देवीशी रिलेट करू शकते. तिच्यात असलेली शुद्धता आणि शांततेची भावना मला खूप भावते आणि मी त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करते. हेच गुण मी माझ्या आयुष्यात आणि निर्णयांमध्ये अंगिकारण्याचा प्रयत्न करते. मला शांतता आवडते आणि गोष्टी पारदर्शक असाव्यात असं वाटतं.”

तेजश्री प्रधानचा चाहतावर्ग मोठा आहे. तिची वक्तव्ये मोठ्या चर्चेत असतात. सोशल मीडियावरदेखील अभिनेत्री सक्रिय असल्याचे दिसते. तिच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी तेजश्री सोशल मीडियावर शेअर करते. चाहत्यांचा तिच्या पोस्टला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, आता वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. समर व स्वानंदी एकत्र कसे येणार, अधिरा व रोहन यांचे लग्न कधी होणार, यादरम्यान काय गमतीजमती घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.