Tejashri Pradhan Shares photo with on-screen Brother and Father: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही तिच्या विविध भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा विविध मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सध्या ती झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करीत आहे. या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. घरातील मोठी जबाबदार मुलगी, जिच्या लग्नाची काळजी सर्वांना लागलेली आहे. घरच्यांच्या मतानुसार तिचे लग्नाचे वय निघून गेले. त्यामुळे सर्वांना तिचे लग्न कधी होईल, याची चिंता लागली आहे.
तिचा भाऊ रोहनने जोपर्यंत त्याच्या ताईचे लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी अट घातली आहे. रोहनवर स्वानंदीचे खूप प्रेम आहे. त्याची अट आणि आईचा हट्ट यांमुळे ती लग्नासाठी तयार झाली आहे. या सगळ्यात समर राजवाडे आणि तिच्यात सतत होणारे गैरसमज, भांडणे तरीही रोहन व अधिरासाठी समंजसपणे घेतलेले निर्णय यांमुळे त्यांच्यातील केमिस्ट्री लक्ष वेधून घेते.
“जेव्हा तुमचा लहान भाऊ…”
तेजश्री ज्या पद्धतीने सीन करते आणि स्वानंदी ही भूमिका साकारतेय ते पाहून प्रेक्षक वेळोवेळी तिचे कौतुक करतात, तिला पाठिंबा देतात. आता मात्र, अभिनेत्री तिच्या भूमिकेमुळे नाही, तर तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आहे.
तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर मालिकेतील तिचा भाऊ रोहन व वडील यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. रोहन म्हणजे अभिनेता राज मोरेबरोबर तेजश्रीने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तिच्या हातात एक डबा दिसत आहे. हा फोटो शेअर करीत तिने लिहिले, “जेव्हा तुमचा लहान भाऊ आईचे प्रेम डब्यात भरून आणतो”.

दुसऱ्या फोटोमध्ये ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोले दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना तेजश्रीने प्रेमाचा दिवस, असे लिहिले आहे. तसेच या कलाकारांनादेखील तिने टॅग केले आहे.

मालिकेतील या कलाकारांच्या भूमिकांना, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. राज मोरे याआधी झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दिसला होता; तर किशोर महाबोले यांनी आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली होती.
दरम्यान, वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले. स्वानंदी व प्रतीकचा साखरपुडा मोडणार आहे. त्यानंतर स्वानंदी लग्न करणार नाही, असा निर्णय घेणार असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळाले. आता मालिकेत पुढे काय होणार, नेमकं काय घडणार,हे पाहण्याठी प्रेक्षक उत्सुक आहेत.