Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच मैनावती व सदाशिव लोखंडे यांची सुभेदारांच्या घरात एन्ट्री झाली. लोखंडे हेच सायलीचे खरे आई-बाबा आहेत असा समज अर्जुनचा होतो आणि तो दोघांनाही घरी घेऊन येतो. मात्र, घरी आल्यावर मैनावतीची चोरी-लबाडी करण्याची वृत्ती याकडे अर्जुनचं बरोबर लक्ष असतं. सायली आणि तिच्या आई-बाबांचे स्वभाव एकदम विरुद्ध आहेत याची त्याला पुरेपूर जाणीव होत असते. आता घरात असा एक प्रसंग घडणार आहे, ज्यामुळे अर्जुनसह अस्मिताच्या मनात सुद्धा शंकेची पाल चुकचुकणार आहे. तो प्रसंग नेमका कोणता पाहुयात…

पूर्णा आजी घरी परतल्यामुळे सुभेदारांच्या घरात यंदाचा दिवाळसण मोठ्या दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पूर्णा आजी घरातल्या मायलेकींना एक खेळ खेळायला सांगते. आजी म्हणते, “तुमच्या घरी जर आगाऊ पाहुणे आले, तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं कराल?”

या खेळात सायली-मैनावती, प्रिया-प्रतिमा आणि कल्पना-अस्मिता या मायलेकींच्या जोड्या जुळवल्या जातात. तर, अर्जुन, रविराज, प्रताप, सदाशिव हे घरचे आगाऊ पाहुणे होतात; ज्यांना या मायलेकींनी बनवलेल्या पदार्थांमध्ये काही ना काही चुका काढायच्या असतात.

सरबत प्यायला देताच अर्जुन म्हणतो, “यामध्ये मीठ खूप जास्त आहे” यावर प्रिया म्हणते, “मी आता परत बनवणार नाही.” इतक्यात मैनावती लगेच म्हणते, “परत-परत काय तेच-तेच बनवायचं त्यापेक्षा बाहेरून मागवा” प्रिया सुद्धा ‘बाहेरून ऑर्डर करा’ असा पर्याय सुचवते.

तर, याचवेळी प्रतिमा आणि सायली एकदम शांत असतात. प्रिया-मैनावतीचं हे सेम टू सेम वागणं पाहून अर्जुनला धक्का बसतो. तर, दुसरीकडे अस्मिता सुद्धा पूर्णा आजीच्या कानात पुटपुटते, “या मैनावती काकू आणि प्रियाचं डोकं किती सेम-सेम चालतं. त्या सायलीपेक्षा प्रियाची आई जास्त वाटतात.”

बहिणीचं हे म्हणणं ऐकताच अर्जुनला या सगळ्याबद्दल अजून शंका येते आणि तो डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतो. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, “मैना काकूंचं वागणं-बोलणं सगळंच सायलीच्या स्वभावाविरुद्ध आहे यांची डीएनए टेस्ट करायलाच पाहिजे”

आता DNA टेस्ट झाल्यावर सायलीच्या आई-बाबांचं खरं सत्य बाहेर येईल का? की प्रिया पुन्हा एकदा तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी ठरून हे डीएनए टेस्टचे रिपोर्ट्स बदलणार? असे प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. मालिकेचा हा विशेष भाग २७ आणि २८ ऑक्टोबरला रात्री ८:३० ला प्रसारित केला जाईल.