Tharala Tar Mag New Twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच वात्सल्य आश्रम केसचा अंतिम निकाल लागणार आहे. या केसमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याची प्रेक्षक गेल्या महिन्याभरापासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अर्जुनने ही न्यायाची लढाई जिंकली असून साक्षी आणि प्रियाला चांगलीच अद्दल घडणार असल्याचं प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.
अर्जुन गेली अडीच वर्षे वात्सल्य आश्रम केसमधून मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत त्याच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. एवढंच नव्हे तर ऐनवेळी कोर्टात प्रियाची देखील चांगलीच फजिती होणार आहे. साक्षी आणि प्रिया स्वत:ला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याची खात्री अर्जुनला असते. म्हणूनच तो भर कोर्टात या दोघींचं भांडण लावून देतो.
अर्जुन कोर्टात प्रियाला वात्सल्य आश्रमासंदर्भात अनेक उलटसुलट प्रश्न विचारतो आणि शेवटी ती वैतागते आणि रडून आरडाओरडा करत कोर्टासमोर विलासवर गोळी साक्षी शिखरेने झाडली असल्याची कबुली देते. यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. परिणामी गेली अडीच वर्षे कोर्टाची दिशाभूल केल्यामुळे प्रियाला शिक्षा सुनावण्यात येते. तर, या केसमधील मुख्य आरोपी साक्षी शिखरेला देखील अटक केली जाते.
प्रियाचं खरं रुप समोर आल्यावर सुभेदार कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसणार आहे. याच रागात पूर्णा आजी नाटकी सुनेला म्हणजेच प्रियाला कानशिलात लगावणार आहे. लवकरच प्रेक्षकांना मालिकेत हा ट्विस्ट पाहायला मिळेल. यादरम्यानचा शूटिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सायली-अर्जुनच्या फॅनपेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रिया दोषी आढळल्यावर रविराज किल्लेदारांची भूमिका काय असेल आणि बायकोला शिक्षा झाल्याचं समजताच अश्विनची प्रतिक्रिया काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक सध्या उत्सुक आहेत.
दरम्यान, कोर्टात अर्जुनच्या बाजूने निकाल लागल्यामुळे प्रेक्षक आनंद व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, निकाल जाहीर होताच दामिनी रागात कोर्टातून निघून जाते. तर, सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात.