Tharala Tar Mag Fame Actor Amit Bhanushali : ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली घराघरांत लोकप्रिय झाला. ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. गेल्या अडीच वर्षांत अमितची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आज ‘फादर्स डे’ निमित्त अमितने त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आजच्या घडीला अमितचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण, अभिनय क्षेत्रातील त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. यावेळी अभिनेत्याला कुटुंबीयांची खूप साथ मिळाली.

अमित भानुशालीचा जन्म गुजराती कुटुंबात झाला आहे. त्याच्या घरातील कोणीच इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नव्हतं. करिअर सुरू केल्यावर सुरुवातीला त्याला या क्षेत्रात कोणाचंही पाठबळ मिळालं नव्हतं. जवळपास दीड वर्षे अभिनेता इंडस्ट्रीत ऑडिशन देत होता. पण, त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. या कठीण काळात अमितला त्याच्या वडिलांनी खूप पाठिंबा दिला.

अमित भानुशालीची वडिलांच्या आठवणीत पोस्ट

I am So Proud To Be Your Son… Love You Baba
बाबा… तुझं नाव घेतलं की, एक वेगळीच ऊर्जा मिळते.
तुझं मूक प्रेम, तुझा आधार आणि तुझं कायमचं मागे उभं राहणं…
हे सगळं शब्दांत सांगणं अशक्य आहे.
आज फक्त तुझं नाही, तर प्रत्येक पावलागणिक तुझ्या आठवणींचंही सेलिब्रेशन आहे.
Happy Father’s Day, बाबा…
तूच माझा पहिला सुपरहिरो आहेस आणि कायम राहशील.

दरम्यान, अमित भानुशाली ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात सुद्धा वडिलांच्या आठवणीत भावुक झाला होता. यावेळी त्याला अमेय वाघ आणि समीर परांजपे यांनी धीर दिल्याचं पाहायला मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर अमित यामध्ये अर्जुन सुभेदार ही मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका रात्री ८.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.