Jui Gadkari Ask Me Session : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. आजवर तिने ‘पुढचं पाऊल’, ‘वर्तुळ’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. जुई सध्या महाराष्ट्राची नंबर वन मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. ती साकारत असलेल्या सायलीच्या भूमिकेला घराघरांत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
जुई गडकरी सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिने इन्स्टाग्राम ‘आस्क मी सेशन’च्या माध्यमातून नुकताच चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी जुईच्या चाहत्यांनी तिला हटके प्रश्न विचारले. “तुझ्या फॅन्सचं वर्णन एका शब्दात करायचं असेल तर तो शब्द कोणता असेल?” या प्रश्नावर जुई म्हणते, “माझे फॅन्स मोदकांसारखे आहेत…एकदम भारी” याबरोबर तिने स्वत: केलेल्या मोदकांचा फोटो देखील शेअर केला आहे.
अभिनेत्रीच्या दुसऱ्या एका चाहतीने, “तू मालिकेतील सायलीच्या भूमिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही खूप जास्त शांत आहेस का?” असा प्रश्न विचारला. यावर जुईने, “मी खूप मस्तीखोर आहे” असं उत्तर दिलंय.
जुईला एका युजरने तिच्या लग्नाबद्दल सुद्धा प्रश्न विचारल्याचं या ‘आस्क मी सेशन’मध्ये पाहायला मिळालं. “ताई तुझं लग्न ठरलंय का?” असा प्रश्न विचारताच जुईने मिश्किलपणे फक्त ३ शब्दांत उत्तर दिलं आहे. “ठरलं तर मग!!” असं उत्तर देत जुईने यापुढे हसायचे इमोजी शेअर केले आहेत.

जुई गडकरीने काही महिन्यांपूर्वी तिच्या लग्नाबद्दल लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती, “माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या त्याच्या मर्जीनुसारच घडल्या आहेत. त्यामुळे माझं लग्न व माझं सगळं पुढचं आयुष्य हेसुद्धा त्याच्या मर्जीनुसारच घडणार आहे. मला अनेक जण म्हणतात, आता तू पस्तीशी ओलांडली; कधी करणार लग्न? तेव्हा मी स्वत:ला समजावते. या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर असतं, तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा त्रास होत नाही.”