Tharala Tar Mag Fame Priyanka Tendolkar New Home : ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलिशान घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली. आता या पाठोपाठ मालिकेतील खलनायिका प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने नवीन घर घेतलं आहे.

प्रियांकाने काही दिवसांपूर्वीच नव्या घराची पहिली झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. आता नुकत्याच ‘स्टार मीडिया मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने नवीन घर घेतल्याचं जाहीर केलं आहे. तसेच या नव्या घराविषयी भावनाही व्यक्त केल्या आहेत.

प्रियांका तेंडोलकर म्हणते, “हे घर माझ्या आई-बाबांचं आणि माझं आहे. आम्ही तिघांनी मिळून हे घर घेतलंय. माझा जन्म चाळीत झाला होता, त्यानंतर मग आम्ही 1RK मध्ये राहायला गेलो. मध्यंतरी काही वर्षे 1BHK मध्ये राहिलो. मग, आता माझ्या आई-बाबांचं स्वप्न होतं की 2BHK घर घ्यायला पाहिजे. महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने हे शक्य झालं आणि आमचं नवीन घर झालं.”

प्रियांकाच्या घराची नेमप्लेट खूपच सुंदर आहे. या नेमप्लेटवर सगळ्यात वर तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक आहे. यानंतर दिपक प्रियांका ज्योती तेंडोलकर असं नाव लिहिण्यात आलं आहे. या नेमप्लेटवर पिवळ्या झेंडुच्या फुलाची सुंदर अशी डिझाइन करण्यात आली आहे. प्रियांकाने मुलाखतीत हे घर तिच्या आई-बाबांचं आणि तिचं आहे असं सांगितलं; यानुसार घराच्या नेमप्लेटवर सुद्धा या तिघांची नावं लिहिण्यात आली आहेत.

ttm actress new home
Tharala Tar Mag : ठरलं तर मग फेम प्रियाने घेतलं नवीन घर

दरम्यान, प्रियांका तेंडोलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आजवर तिने ‘साथ दे तू मला’, ‘फुलपाखरू’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘ठरलं तर मग’मुळे तिला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. खलनायिकेचं पात्र असलं तरीही प्रियावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कार सोहळ्यात सुद्धा प्रिया यंदाची सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरली होती.