Tharala Tar Mag Fame Actress Jui Gadkari Pursuing Master Degree : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच चाहत्यांबरोबर एक खास अपडेट शेअर केली होती. जुई Master In Entrepreneurship ( उद्योजकता ) या विषयात तिचं पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण करत आहे. सेटवर मोकळा वेळ मिळाल्यावर अभिनेत्री अभ्यास करून तिच्या असाइनमेंट पूर्ण करत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय.

जुईने मास्टर्स डिग्रीबद्दल स्वत: पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. ‘नवीन सुरुवात’ असं कॅप्शन देत जुईने ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तिचं शिक्षण पूर्ण करत असल्याचं सर्वांना सांगितलं आहे. मात्र, यशस्वी अभिनेत्री असूनही जुईने अभ्यासाकडे वळण्याचा आणि मास्टर्स करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडला आहे. यावर अभिनेत्रीने तिच्या ‘आस्क मी सेशन’मध्ये भाष्य केलं आहे.

तू यशस्वी अभिनेत्री आहेस तरीही मास्टर्स करण्याचा निर्णय का घेतला?

चाहत्याच्या या प्रश्नावर जुई म्हणते, “मला नेहमी नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. मी आधीच Advertising And PR या विषयात मास्टर्स पूर्ण केलेलं आहे. याशिवाय माझं MBA सुद्धा पूर्ण झालं आहे. पण, तरीही मला वाटलं की आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे…म्हणूनच आता मी माझी दुसरी मास्टर्स डिग्री उद्योजकता या विषयात मिळवणार आहे.”

जुई गडकरीच्या एनर्जीचं सिक्रेट काय?

“रात्री उशिरापर्यंत अनेकदा १२ तासांहून अधिक वेळ शूटिंग करून जुई तिचा मास्टर्सचा अभ्यास कसा करते? हे शेड्यूल कसं मॅनेज करते? यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणते, मला असं वाटतं आपण नेहमी मनासारखं जगावं. त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं काम मी करत राहते. हो, मलाही कंटाळा येतो…मी सुद्धा दमते पण, तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला खूप एनर्जी मिळते. तुमच्यामुळे मला प्रेम आणि नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते..यामुळेच मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करते.” अर्थात प्रेक्षकांचं प्रेम हीच माझी एनर्जी असल्याचं जुईने म्हटलं आहे.

Jui Gadkari
जुई गडकरीने सांगितलं मास्टर्स डिग्री करण्याचं कारण…

दरम्यान, जुई गडकरी प्रमुख भूमिका साकारत असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका रोज रात्री साडेआठ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाते.