Actress Jyoti Chandekar Passed Away : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेतील सगळ्याच कलाकारांना धक्का बसला आहे. अभिनेत्री जुई गडकरीने ( सायली ) पूर्णा आजीच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “तुझं असं जाणं मी स्वीकारू शकत नाही. तू फसवलंस आजी…” असं जुईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसह जुईने मालिकेच्या सेटवरचा त्या दोघींचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये जुईच्या लाडक्या पूर्णा आजीने तिला प्रेमाने जवळ घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत कल्पनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी “मिस यू ज्योती ताई” अशी पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्योती ताई!!! तुमची कारकीर्द आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी राहील. – सोनाली कुलकर्णी

दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव पौर्णिमा असून त्यांची धाकटी मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालायात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.