Tharala Tar Mag Fame Purna Aaji Dance Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. ही मालिका गेली अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली-अर्जुन, पूर्णा आजी, कल्पना, प्रिया, साक्षी, महिपत या सगळ्याच कलाकारांना महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळालं आहे. अलीकडच्या सगळ्याच मालिकांसाठी कलाकारांना तब्बल १२ तासांहून अधिक वेळ प्रचंड मेहनत घेऊन शूटिंग करावं लागतं. त्यामुळे टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांमध्ये तसेच सेटवरच्या तंत्रज्ञांमध्ये खूप छान बॉण्डिंग तयार होतं.

काही दिवसांपूर्वीच जुई गडकरीला रक्षाबंधन सणानिमित्त तिच्या हेअर ड्रेसरने प्रेमाने राखी बांधल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरून पूर्णा आजीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. मालिकेत पूर्णा आजीची भूमिका लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारत आहेत. मात्र, मालिका सुरू झाल्यापासून आता त्यांना घराघरांत ‘पूर्णा आजी’ म्हणून ओळखलं जातं.

ज्योती चांदेकर यांनी ‘ठरलं तर मग’च्या सेटवरील त्यांच्या मेकअप आर्टिस्ट व हेअर स्टायलिस्ट संजना यांच्याबरोबर खास व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये पूर्णा आजीने जुन्या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

पूर्णा आजीने “कजरा मोहब्बत वाला अंखियों में ऐसा डाला…” या जुन्या सदाबहार बॉलीवूड गाण्यावर सादरीकरण केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हे गाणं ‘किस्मत’ सिनेमातील आहे. हा चित्रपट १९६८ मध्ये प्रदर्शित झाला होता, तरी आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. इन्स्टाग्राम रील्सवर हे गाणं सध्या ट्रेंडिंग आहे. त्यामुळे या लोकप्रिय गाण्यावर रील व्हिडीओ बनवण्याचा मोह पूर्णा आजीला देखील आवरला नाही.

पूर्णा आजीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे कमाल हावभाव विशेष लक्ष वेधून घेतात. नेटकऱ्यांनी सुद्धा या ज्येष्ठ अभिनेत्रीचं सादरीकरण पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. पूर्णा आजींची एनर्जी तरुणाईला लाजवेल अशी आहे असं अनेकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सिरिलयमध्ये पूर्णा आजीने पुन्हा एकदा सायलीचा सून म्हणून स्वीकार केला आहे. आता लवकरच ती याबाबत कल्पनाशी बोलेल, तिचंही मन वळवेल असा शब्द आजीने सायलीला दिला आहे.