Tharala Tar Mag Producer Suchitra Bandekar : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीतील तसेच मालिकेतील कलाकार, त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

ज्योती चांदेकर गेली अडीच वर्षे ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होईल का? याबद्दल चर्चा सुरू झाल्या. यावर, “आम्ही पूर्णा आजी म्हणून कोणालाच पाहू शकत नाही, आम्ही आमच्या पूर्णा आजीला कायम मिस करू” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. याबद्दल आता स्वत: ‘ठरलं तर मग’च्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सुचित्रा बांदेकर ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “१० ऑगस्टला त्या सेटवरून निघाल्या, ११ तारखेला त्या पुण्याला गेल्या. १२ ऑगस्टला रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मला रात्री तेजस्विनी पंडित म्हणजेच आपल्या तेजुचा फोन आला आणि तिने मला सांगितलं आईला व्हेंटिलेटरवर ठेवलंय. मला ते ऐकून धक्का बसला ती म्हणाली, सुचित्रा ताई तिच्या संपूर्ण शरीरात बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे. पण, तिने ४ दिवस झुंज दिली. ती अशी अचानक सोडून गेली तिला आम्ही कधीच विसरू शकणार नाही. संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला बसलेला हा खूप मोठा धक्का आहे.”

“गेल्या दोन ते अडीच वर्षांत ती अनेकदा आजारी पडली. सेटवरच्या मुलांनी तिला अनेकदा दवाखान्यात नेलंय. एक फोन आला की, तिला सगळे घरी घ्यायला जायचे. सगळे तिच्या इतक्या जवळचे होते की, अगदी सेटवरच्या हेअर स्टायलिशबरोबर वगैरे ती मस्त रील व्हिडीओ बनवायची.”

पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार की नाही?

“ज्योती चांदेकर अनेक वर्षे या मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. पण, तिने प्रत्येकाच्या मनावर पूर्णा आजीच्या भूमिकेतून एक वेगळी छाप सोडली. कलाविश्वात काम करताना नेहमी बोललं जातं शो मस्ट गो ऑन! आपल्याला पुढे कोणाला तरी घेऊन ते काम पूर्ण करावं लागेल पण, हे अत्यंत कठीण आहे. चॅनेल आणि आमच्या प्रोडक्शन टीमने अजूनही यावर कोणताही विचार केलेला नाही. आम्हाला आणि प्रेक्षकांना सावरायला थोडा वेळ हवा आहे. मी ज्या-ज्या कमेंट्स वाचतेय त्यात प्रेक्षकही असं म्हणत आहेत की, आम्ही दुसऱ्या कोणाला पूर्णा आजीच्या रुपात बघू शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेऊ” असं सुचित्रा बांदेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ज्योती चांदेकर यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. गेली अडीच वर्षे त्या पूर्णा आजीच्या रुपात रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे.