Tharla Tar Mag Fame Priyanka Tendolkar New Home : प्रियांका तेंडोलकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रिया हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. प्रियांका सध्या चर्चेत आहे ते तिच्या नवीन घरामुळे. तिने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे.
प्रियांकाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. अशातच आता तिने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने तिच्या नवीन घराबद्दल सांगितलं आहे. यामध्ये तिने ती आधी चाळीत राहायची, नंतर ती व तिचे आई-वडील बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाले आणि आता त्यांनी २ बीएचके असं मोठं घर खरेदी केलं आहे. यासह तिने घर वास्तुशास्त्रानुसार सजवलं आहे, याबद्दलही सांगितलं आहे.
प्रियांकाची नवीन घराबद्दल प्रतिक्रिया
मुलाखतीत प्रियांकाने तिचा इंटिरिअर डिझायनिंगचा व्यवसायही असल्याचं सांगितलं आहे. ती घराबद्दल म्हणाली, “मी खूप डोकं लावून आणि खर्च कसा कमी होईल हा विचार करून इंटिरिअर केलं आहे. खूप लोकांना वाटतं इंटिरिअर महाग आहे, पण तसं नसतं; नीट डोकं लावून केलं तर सगळं होतं.”
प्रियांकाने वास्तुशास्त्रानुसार सजवलंय नवीन घर
वास्तुशास्त्राबद्दल ती म्हणाली, “माझी आई बऱ्यापैकी वास्तुशास्त्र वगैरेवर विश्वास ठेवते, तिच्यामुळे माझाही आहे, त्याचा फायदाच झाला आहे; त्यामुळे बऱ्याच गोष्टी वास्तुनुसार केल्या आहेत. म्हणजे देव्हारा इथे असायला हवा, तर तो त्यानुसार तिथे ठेवला आहे. मनी प्लँटही त्यानुसारच.” प्रियांकाने पुढे सांगितलं की तिच्या घरामधील किचन आणि तिच्या बेडरूममधील आरसा या अशा सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार केल्याचं म्हटलं आहे.
प्रियांकाच्या घरामध्ये लाकडी फर्निचरचा अधिक प्रमाणात वापर करण्यात आला असून तिच्या हॉलमध्ये सुंदर असं रंगबीरंगी मोठं पेंटिंगही आहे, जे पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंतींवर उठून दिसतं. यासह तिच्या घरात सुंदर असा देव्हाराही आहे, जे तिच्यासाठी खूप खास आहे; कारण तिने तिच्या जुन्या घरातून नवीन घरात येताना फक्त देव्हारा सोबत घेतल्याचं सांगितलं, ज्याला तिने नंतर अजून डेकोरेट करून सजवलं आहे. यासह तिच्या खोलीतही तिचे लहनपणीचे वेगवेगळे अनेक फोटो असून ते तिने भिंतीवर फ्रेम केले आहेत.
प्रियांकाच्या २ बीएचके घरात तीन बाल्कनी, दोन बेडरूम. छान आणि आकर्षित असं स्वयंपाकघर, सुंदर हॉल असल्याचं या मुलाखतीत तिने दाखवलं आहे; त्यामुळे प्रियांकाने यातून पहिल्यांदाच तिच्या नवीन घराची खास झलक दाखवली आहे.
