Tharla Tar Mag Fame Jui Gadkari’s Skin Care Routine : टेलिव्हिजनवरील आपल्या आवडत्या मालिका सगळ्या गृहिणी न चुकता पाहतात. अनेकदा मालिकेत काम करणाऱ्या नायिका इतक्या सुंदर कशा काय दिसतात असे प्रश्न आपल्याला पडतात. मात्र, तुम्हाला माहितीये का? या नायिका आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतात, यासाठी अनेक अभिनेत्री हेल्दी डाएट सुद्धा फॉलो करतात.
यापैकी ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या जुई गडकरीने नुकतंच तिचं स्किन केअर रूटीन चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. जुई गेली अनेक वर्षे मालिकाविश्वात काम करत आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जुई दिसायला अगदी सोज्वळ अन् अतिशय सुंदर आहे त्यामुळे अनेकांना अभिनेत्री तिच्या त्वचेची काळजी कशी काय घेत असेल असा प्रश्न पडतो. नुकत्याच घेतलेल्या इन्स्टाग्राम ‘आस्क मी सेशन’मध्ये जुईने चाहत्यांना उत्तर देताना याबद्दल खुलासा केला आहे.
जुईला एका चाहतीने विचारलं, “तुम्ही चेहऱ्याला कोणती क्रीम लावता? आम्हालाही कळेल का? सिक्रेट काय आहे, तुमची त्वचा किती मुलायम आहे.” यावर अभिनेत्री म्हणाली, “आपली स्किन कोणतंही क्रीम लावून मुलायम होत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी हेल्दी जेवण जेवा, मॉइस्चरायझर न विसरता लावा, सनस्क्रीन लावून कमीत कमी मेकअप करा किंवा मेकअप नाही केला तरीही चालेल…आमच्या क्षेत्रात दररोज १४ तास तरी आम्हाला मेकअप करावा लागतो…त्यामुळे त्वचेची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. आणखी एक सिक्रेट म्हणजे…खूप जास्त पाणी प्यावं…तेलकट पदार्थ, जंक फूड अजिबात खाऊ नका.”

अभिनेत्रीला दुसऱ्या एका चाहतीने, “खरं खरं सांग तू Botox केलंय का? तुझ्या चेहऱ्यावर अजिबातच सुरकुत्या नाहीत…” असा प्रश्न जुईला विचारला.
यावर अभिनेत्री म्हणाली, “Botox नाहीच… या मागचं खरं कारण सांगू का? मी सकाळी उठून चेहऱ्याला दररोज बर्फ लावते. सकाळी उठल्यावर २ मिनिटं तरी संपूर्ण चेहऱ्यावर बर्फ फिरवते. यामुळे स्क्रिन फ्रेश होते, त्वचेची लवचिकता वाढते, रक्ताभिसरण व्यवस्थित होतं, मेकअप नीट सेट होतो आणि चेहऱ्यावरचा फुगीरपणा कमी होतो, सूज निघून जाते…हा सोपा उपाय नक्की ट्राय करा…तुम्हाला हे केल्यावर चेहऱ्यात नक्कीच बदल जाणवेल आणि तुम्ही मला थँक्यू म्हणाल…सर्वात महत्त्वाचं म्हणते Say No To Botox!”

दरम्यान, जुई गडकरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.