Tharla Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन प्रिया विरोधात नवनवीन पुरावे शोधत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. कोर्टाकडून परवानगी घेऊन अर्जुन प्रियाची मानसोपचार तज्ज्ञांसमोर चौकशी करतो. आता या चौकशीदरम्यान प्रिया असं काही बरळणार आहे की, ज्यामुळे आश्रम केसमध्ये अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागणार आहे.
अर्जुन प्रियाची चौकशी करत असताना तिला उलट-सुलट अनेक प्रश्न विचारतो. यामुळे ती चिडून म्हणते, “हजारदा सांगितलंय… भांडणाचा आवाज आला तेव्हा मी बाहेर आले आणि तेव्हा मला दिसलं की, मधुभाऊंनी डाव्या खिशातून बंदूक काढली आणि…” ती पुढे बोलत असतानाच अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो, “जस्ट अ सेकंड…गेल्यावेळी तू म्हणाली होतीस तसं तुझं स्पष्ट स्टेटमेंट आहे की…मधुभाऊंनी पिस्तूल कुठून काढलंय ते तुला आठवत सुद्धा नाहीये आणि आता डायरेक्ट म्हणतेस डावा खिसा…दॅट्स स्लॉव्ह मिस तन्वी खोटं बोलतेय.”
अर्जुन सर्वांसमोर जाब विचारून प्रियाची पुरती कोंडी करतो. त्यामुळे ती प्रचंड घाबरते…आता महिपतची नवीन वकील दामिनी प्रियाची मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मानसोपचार तज्ज्ञांसमोर झालेल्या चौकशीच्या रिपोर्ट्समध्ये अर्जुनच्या हाती नेमकं काय-काय लागलंय हे जाणून घेण्यासाठी दामिनी सायली-अर्जुनला घरी जेवणासाठी आमंत्रित करते. यावेळी सायली दामिनीसमोर ठामपणे आपल्या नवऱ्याची बाजू घेत दामिनीची बोलती बंद करते…
अर्जुन : तुम्ही आम्हाला प्रेमापोटी इथे जेवायला बोलावलेलं नाहीये…त्यामुळे आपण थेट मुद्द्याला हात घालूया.
दामिनी : प्रिया मधुकरची सायकोलॉजिस्टने जी चौकशी केली… त्याचे रिपोर्ट्स हवेत मला…
सायली : याचा अर्थ तुम्हालाही खात्री आहे की, प्रिया खोटं बोलतेय.
अर्जुन : त्या रिपोर्ट्समध्ये काय आहे हे तुम्हाला कळेलच… पण, कोर्टात.
सायली : पहिली हार स्वीकारण्यासाठी तयार व्हा! कारण, तुमचा सामना माझ्या नवऱ्याशी आहे.
सायलीचं हे रोखठोक उत्तर ऐकून दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. यावरून आता लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा एकदा कोर्टरुम ड्रामा सुरू होणार हे निश्चित झालं आहे. आता अर्जुन त्याच्या हाती लागलेले सगळे पुरावे कोर्टात सादर करेल आणि त्यानंतर मधुभाऊ सुखरुप सुटणार की नाही याचा निर्णय दिला जाईल.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग १० मे रोजी रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. पुढे या मालिकेत काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.