Thoda Tuza Ani Thoda Maz Fame Actress Shared Her Experience of Working with Irfan Khan : दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनामध्ये घर केलं होतं. आजही अनेक जण त्यांचे चित्रपट पुन्हा बघताना दिसतात. इरफान खानबरोबर एकदा तरी काम करता यावं अशी अनेकांची इच्छा असायची. अशातच नुकतच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’फेम अभिनेत्रीने इरफान खानसह काम केल्याचा तिचा अनुभव एका मुलाखतीमधून सांगितला आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत गायत्री हे खलनायिकेचं पात्र साकारणार अभिनेत्री मानसी कुलकर्णीने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. यामध्ये तिने इरफान खान यांच्याबरोबर जाहिरातीमध्ये काम केल्याचा तिचा अनुभव सांगितला.

मानसीला मुलाखतीमध्ये “तुझ्या आयुष्यातील असं कोणतं ऑडिशन आहे जे आजही तुझ्या लक्षात आहे”, असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर ती म्हणाली, “इरफान खान यांच्याबरोबर मी एक जाहिरात केली होती. त्या जाहिरातीचं ऑडिशन देताना मला माहीत होतं की त्यामध्ये इरफान खान असणार आहेत. पण, जाहिरात या क्षेत्रात खूप स्पर्धा असते. खूप ऑडिशन दिल्यानंतर कधीतरी एखादी जाहिरात मिळते असं होतं. ती एक टायरची जाहिरात होती. इरफान खान जाहिरातीत आहेत म्हणून मी खूप उत्सुक होते.”

मानसी याबाबत पुढे म्हणाली, “मी ऑडिशन दिली, पण दोन महिने काही अपडेट आली नाही, त्यामुळे मला वाटलं की गेली ती जाहिरात हातून. पण नंतर मला कळलं की इरफान खान त्यांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने त्यांच्या तारखा मिळत नव्हत्या. पण, शेवटी मला कॉल आला आणि सांगण्यात आलं की तुम्ही जाहिरातीसाठी शॉर्टलिस्ट झाला आहात. शॉर्टलिस्ट झाले ऐकल्यानंतर मी माझी उत्सुक्ता थोडी रोखून धरली, कारण ३-४ जणं शॉर्टलिस्ट होतात. पण, शेवटी मला माझी निवड झालीये असं सांगण्यात आलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी या जाहिरातीबद्दल पुढे म्हणाली, “मला त्यांच्याबरोबर काम करून खूप मज्जा आली. त्यांच्या कामात खूप सहजता आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा माझा खूप चांगला अनुभव आहे. तो माणूस ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन सारखाच आहे. काही कलाकार कॅमेऱ्यासमोर वेगळे आणि कॅमेरा बंद झाला की वेगळे असं असतं, पण इरफान खान यांचं तसं नाहीये; इतकी त्यांच्या कामामध्ये सहजता आहे. मी एक दिवस त्या जाहिरातीनिमित्त इरफान खान यांच्यासह काम केलं. त्यांचा अनुभव त्यांच्या कामातून बोलतो. त्या माणसाबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत तेवढे. एरवी सीनपूर्वी कलाकार तालीम करतात, पण त्यांचं तसं नव्हतं.”