Thoda Tuza Ani Thoda Maza serial last episode: काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्यापैकीच एक स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका आहे. या मालिकेचे कथानक व मालिकेतील पात्रे यामुळे ही मालिका लोकप्रिय ठरली.

आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेचे शूटिंग संपले आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. आता लवकरच मालिकेचा अंतिम भाग प्रदर्शित होणार आहे.

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा ‘असा’ असेल अंतिम भाग

स्टार प्रवाह वाहिनीने ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सर्व कुटुंब एकत्र आहे, त्यावेळी गायत्रीचे बाबा तिच्या मुलाला हाताशी धरून तेजसला कागदपत्रांवर सह्या करायला लावतात.

ते बंटीला इजा पोहोचवण्याची धमकी देतात. बंटीचा जीव धोक्यात असल्याचे पाहून तेजस कागदपत्रांवर सह्या करायला तयार होतो. तो म्हणतो की, बंटीला काहीही होता कामा नये मी सही करतो. हे पाहून गायत्रीला वाईट वाटते. ती मनातल्या मनात म्हणते की, इतकी वर्षे सहीसाठी अडवून ठेवणारा तेजस आज फक्त माझ्या बंटीसाठी… ती मनाशी निर्धार करून तेजसला सह्या करण्यापासून थांबवते. ती म्हणते की तू सही करायची नाहीस, तुला बंटीची शपथ आहे. ती हातात बंदूक घेते आणि तिच्या वडिलांवर रोखते. मानसी पोलिसांना बोलावते व गायत्रीच्या पोलिसांच्या वडिलांना ताब्यात देते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की मानसी तेजसवरचा सगळा राग विसरून त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करते. ती म्हणते, “आज प्रभूंचं कुटुंब पूर्ण झालं. आज सगळ्या प्रभूंच्या साक्षीने सांगते, या लकी चार्मचं तिच्या राष्ट्रहितांवर मनापासून प्रेम आहे. गायत्री म्हणते, नातं हे नवसाचं… पुढे मानसी व तेजस म्हणतात की थोडं तुझं आणि थोडं माझं; तर कुटुंबातील सर्व सदस्य टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “अखेर गायत्रीला कळणार आपल्या नात्यांची किंमत…”, अशी कॅप्शन दिली आहे. ११ आणि १२ सप्टेंबरला हा अंतिम भाग प्रदर्शित होणार आहे.

नेटकरी काय म्हणाले?

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी काही कमेंट्स करत भावना व्यक्त केल्या आहेत. “बरं झालं वेळेत संपवली मालिका. शॉर्ट बट स्वीट”, “ही सर्वोत्तम मालिका आहे, वेळेत आणि खूप छान वळणावर संपवली. इतर मालिकांसारखी उगाच फालतूपणा दाखवून लांबवली नाही”, “तेजसच्या कॉमेडीची आठवण येईल”, “थोडं तुझं आणि थोडं माझंच्या संपूर्ण टीमची आठवण येईल”, अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी मालिकेचे कौतुक केले आहे.

या मालिकेत मानसीच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे, गायत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णी, तर समीर परांजपेने तेजस ही भूमिका साकारली होती. आता या मालिकेनंतर हे कलाकार कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.