Titeeksha Tawade Shared A Post : तितीक्षा तावडे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी यामार्फत शेअर करीत असते. अशातच तिनं तिची बहीण व अभिनेत्री खुशबू तावडेसाठी खास पोस्ट केली आहे.
तितीक्षा तावडे व खुशबू तावडे या दोघींनी आजवर अनेक मालिकांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेकदा या दोघी एकमेकींबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. अशातच मोठ्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तितीक्षानं पोस्ट शेअर करीत तिचं कौतुक केलं आहे.
तितीक्षा तावडेने केलं खुशबू तावडेचं कौतुक
काल (५ सप्टेंबर) खुशबू तावडेचा वाढदिवस होता. त्यानिमित्त तितीक्षानं तिच्याबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. तितीक्षानं शेअर केलेल्या पोस्टला खुशबूनं “सोना, लहानपणी मला जेव्हा कोणी विचारायचं की मोठं होऊन काय होणार, तेव्हा मला नाही कळायचं काय बोलावं.. पण आता कोणी विचारलं, तर हेच म्हणेन की, मला मोठं झाल्यावर तुझ्यासारखं व्हायचंय. मला तुझ्याकडून खूप प्रेरणा मिळते. आय लव्ह यू.”
तितीक्षाच्या पोस्टखाली खुशबूनं थँक्यू, अशी कमेंट केली आहे. तिच्यासह या पोस्टखाली अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुरुची अडारकर, सिद्धार्थ बोडके, नम्रता संभेराव, योगिता चव्हाण, निखल बने यांसारख्या कलाकारंनी कमेंट्स करीत खुशबूला शुभेच्छा दिल्या आहेत.
तितीक्षाबरोबर खुशबू तावडेसाठी अभिनेता सिद्धार्थ बोडकेनंही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यानं “एक व्यक्ती विनोदी, निडर, उत्तम व सुंदर कशी असू शकते हे तू सिद्ध केलं आहेस. अशीच प्रगती करीत राहा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असं म्हटलं आहे.
तितीक्षा व खुशबू नुकत्याच गणेशोत्सवानिमित्त कोकणात त्यांच्या गावी गेल्या होत्या. यावेळी दोघींनी कोकणातील त्यांच्या घरातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. दोघींनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर यंदाचा गणेशोत्सव साजरा केला.
दरम्यान, तितीक्षाबद्दल बोलायचं झालं, तर शेवटची ती ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत झळकलेली. जवळपास अडीच वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर आता अभिनेत्री कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अलीकडेच तिनं अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर यांच्याबरोबर व्यवसाय सुरू केला आहे. त्यानिमित्त दोघी अनेकदा सोशल मीडियावर रील व फोटो पोस्ट करीत असतात.