TMKOC Producer Asit Modi Says New Actress Will Play The Role Of Daya : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. १७ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. त्यामुळे यातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. परंतु, यादरम्यान यातील काही लोकप्रिय कलाकारांनी एक्झिटदेखील घेतली, ज्यामध्ये अभिनेत्री दिशा वकानीचाही समावेश आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते अनेकदा दिशा वकानीच्या मालिकेत परतण्याच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांबद्दल बोलत असतात. अशातच आता असित मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशा वकानी यांच्याबद्दल सांगितलं आहे. दिशा वकानी या मालिकेतील महत्त्वाचं दया हे पात्र साकारत होती. त्यामुळे आजही प्रेक्षक मालिकेत तिच्या परतण्याची वाटत पाहत आहेत.

दिशा वकानी यांच्या एक्झिटनंतर घाबरलेलो – असित मोदी

असित मोदींनी याबद्दल ‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना सांगितलं, “हो मला अनेकदा लोक दिशा वकानी यांच्याबद्दल विचारत असतात. मी खरं सांगतो हे पूर्वी कधीच सांगितलेलं नाहीये; पण जेव्हा २०१७ मध्ये दिशा यांनी ही मालिका सोडली तेव्हा मी खूप घाबरलेलो. जेठालालबरोबर दया सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे. दयाची बोलण्याची पद्धत देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे मी बराच काल दिशाच्या जागी दुसऱ्या कोणाचीही निवड केली नाही.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये होणार नवीन दयाची एन्ट्री

असित मोदी पुढे म्हणाले, “२०२२-२३ पासून मी नवीन दयाबेनच्या शोधात आहे. नुकतीच आमच्या मालिकेला १७ वर्ष पूर्ण झाली आणि आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता या मालिकेत नवीन दया आणण्याची वेळ आली आहे.”

दिशा वकानीबद्दल असित मोदी म्हणाले, “दिशा आणि माझे खूप चांगले संबंध आहे. आमच्यामध्ये कुठलेही वाद नाहीत. मला पुन्हा त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. त्यांनी मालिका सोडल्यानंतर मी प्रार्थना करीत होतो की, त्यांनी परत यावं. परंतु, त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे असं होऊ शकलं नाही.”

दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दिशा वकानीव्यतिरिक्त इतरही काही कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली. तर, १७ वर्षांमध्ये बऱ्याचदा या मालिकेत काही मोठे बदल होताना दिसले. आता असित मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे मालिकेत नवीन दया येणार असून, ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे मालिकेच्या येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल.