Star Pravah Tu Hi Re Maza Mitwa Promo : ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेऊन ‘स्टार प्रवाह’ने अलीकडेच या मालिकेची वेळ बदलून अर्णव-ईश्वरीच्या प्रेमकहाणीला प्राइम टाइमचा स्लॉट दिला आहे. आता ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित केली जाते. याशिवाय येत्या दोन दिवसांत ‘तू ही रे माझा मितवा’मध्ये प्रेक्षकांना एक जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार आहे. मालिकेत नेमकं काय घडणार आहे जाणून घेऊयात…

गेल्या काही दिवसांपासून राकेश भोसले राजेशिर्केंच्या घरात तळ ठोकून बसल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान त्याने अनेकदा ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. पण, अर्णवच्या हस्तक्षेपामुळे त्याचा एकही डाव यशस्वी होऊ शकला नाही. ईश्वरीला मिळवायचं असेल तर, सर्वात आधी अर्णवचा काटा काढला पाहिजे याची पुरेपूर जाणीव राकेशला असते. याचमुळे तो एक मोठा डाव रचणार आहे.

राकेश अर्णवचा खून करण्याची सुपारी देतो. राजेशिर्केंच्या घरी सणासुदीनिमित्त कार्यक्रम असतो, तसेच जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली असते. या जेवणाच्या मंडपात अर्णव आला की, त्याच्यावर वार करा असे आदेश राकेशने दिलेले असतात. अर्णवला चारही बाजूंनी घेरलं जातं….समोरची स्त्री त्याच्यावर कोयत्याने वार करणार इतक्यात ईश्वरी या मंडपाजवळ पोहोचते आणि नवऱ्याच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभी राहते.

अर्णववरचा प्रत्येक हल्ला ईश्वरी मोठ्या धीराने परतवून लावते. यानंतर अर्णव पटकन स्वत:ला सावरतो आणि बायकोसह समोरच्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी उभा राहतो. अर्णव-ईश्वरी दोघे मिळून राकेशच्या भाडोत्री गुंडांना चांगलाच धडा शिकवतात.

महत्त्वाचं म्हणजे ईश्वरीने हे सगळे जबरदस्त फायटिंग सीन नऊवारी साडी नेसून केले आहेत. त्यामुळे हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. शेवटी घरातल्या घरात हा इतका मोठा जीवघेणा हल्ला कुणी केला असेला अशी शंका ईश्वरी उपस्थित करते. आता अर्णव-ईश्वरी मिळून राकेशचं कारस्थान उघडकीस आणणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, प्रेक्षकांनी सुद्धा या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा विशेष भाग ३० आणि ३१ ऑक्टोबरला रात्री आठ वाजता प्रसारित केला जाईल.