Tu Hi Re Maza Mitwa Serial 300 Episode Celebration : स्टार प्रवाहवरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. या मालिकेतील अर्णव-ईश्वरीची जोडी प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अर्णव-ईश्वरी यांचं मालिकेत नुकतंच लग्नही पार पडलं आहे. त्यामुळे नवरा-बायको म्हणून या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच आवडत्या मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा पार केला आहे.

मालिकेत अर्णव-ईश्वरी या दोघांमधील प्रेम हळूहळू वाढत आहे. अर्णवच्या मनात ईश्वरीविषयी प्रेम होतंच, पण आता ईश्वरीलासुद्धा अर्णव आवडू लागला आहे. ईश्वरीच्या मनात राकेश अर्णवबद्दल जाणूनबुजून गैरसमज निर्माण करत असतो, मात्र लग्नानंतर अर्णवनं ईश्वरीसमोर राकेशचा खरा चेहरा समोर आणला आहे. अर्णव-ईश्वरी या दोघांची ही नव्याने सुरू झालेली लव्हस्टोरी प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

अशातच मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा पार केला आणि यानिमित्त सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ स्टार प्रवाह आणि अभिनेत्री शर्वरी जोगच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. सेलिब्रेशनचा आनंद प्रेक्षकांसह साजरा करण्यासाठी इन्स्टाग्राम लाईव्ह करण्यात आलं होतं.

या लाईव्हमध्ये अर्णवनं प्रेक्षकांना सेटवरील ३०० भाग पूर्ण झाल्यानिमित्तच्या सेलिब्रेशनची खास झलक दाखवली. यात सर्व तंत्रज्ञांनी मिळून केक कट केला. तसंच या सेलिब्रेशनला अर्णव-ईश्वरी यांच्याशिवाय आशुतोष गोखले, रुपाली नंद आणि इतर कलाकार मंडळीसुद्धा हजर होती. ३०० भागांच्या सेलिब्रेशननिमित्तानं सेटवर फुगे आणि फुलांची सजावट करण्यात आल्याचंही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या व्हिडीओच्या शेवटी अर्णव-ईश्वरी म्हणजेच अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग यांनी मिळून प्रेक्षकांना मालिका बघण्याचं आणि दोघांवर असंच प्रेम करण्याचं आवाहन केलं आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेच्या प्रसारणाची वेळ आता बदलली आहे. याआधी ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जायची. मात्र, आता ही मालिका रात्री ८ या नवीन वेळेत प्रसारित होत आहे.