Tu Hi Re Maza Mitwa Serial Update : स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ ही नव्यानं सुरू झालेली मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करीत आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट, अर्णव-ईश्वरीची केमिस्ट्री आणि उत्तम कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या प्रसारणाची वेळ रात्रीची असूनही गेले मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून आहे. मालिकेत पुढे काय होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली असते.

मालिकेत काही दिवसांपूर्वीच अर्णव-ईश्वरीचं लग्न झालं. ईश्वरी या लग्नाला सुरुवातीला तयार नव्हती. पण राकेशचा खरा चेहरा समोर आल्यानंतर तिचा अर्णवविषयीचा गैरसमज दूर झाला आहे. तसंच दोघांची नात्यात पुन्हा मैत्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राकेश सध्या राजेशिर्के यांच्याच घरी राहत असून तो ईश्वरीला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याचाच एक प्रोमो समोर आला आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत सध्या दिवाळी विशेष भाग पहायला मिळत आहे. त्यात ईश्वरी-अर्णव यांचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण आहे. या आनंदाच्या वातावरणात राकेश मात्र मिठाचा खडा टाकणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या भागात ईश्वरी दिवाळी पाडव्याची तयारी करताना दिसत आहे. मात्र तेवढ्यात राकेश येतो आणि तिचा हात पडकतो. ईश्वरी तो हात अर्णवचा असल्याचं समजते. पण तो राकेश असल्याचं कळताच ती घाबरते.

पुढे राकेश तिच्या हाताने स्वत:ला उठणं लावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, “याच हातांनी उठणं लावायची माझी इच्छा आहे.” तेवढ्यात सुदैवाने तिथं अर्णव येतो आणि तो राकेशला रोखतो. त्यानंतर अर्णव राकेशच्या तोंडावर उठणं फेकतो आणि ईश्वरीला धीर देत म्हणतो, “ज्या हातांनी याने तुला स्पर्श केला आहे, त्याच हातांनी तो तुझे पाय धुणार. हा माझा शब्द आहे आणि हेच माझ्याकडून तुझ्यासाठी दिवाळी पाडव्याचं गिफ्ट असेल.”

तू ही रे माझा मितवा मालिका प्रोमो

हा प्रोमो शेअर करीत “अर्णव ईश्वरीला पहिल्या दिवाळी पाडव्याला हे गिफ्ट देऊ शकेल का?” असं म्हटलं आहे. येते २७ ऑक्टोबर रोजी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दरम्यान, तू ही रे माझा मितवा’ मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे. प्रोमोखालील कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी प्रोमो आवडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.