Tu Hi Re Maza Mitwa Serial Updates : स्टार प्रवाहची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रेक्षकांचं चांगल्या रीतीनं मनोरंजन करीत आहे. कथानकात येणाऱ्या नवनवीन वळणांमुळे प्रेक्षक दिवसेंदिवस मालिकेला पसंती देताना दिसत आहेत. मालिकेत काही दिवसांपूर्वीच अर्णवला राकेशचं सत्य समजल्याचं पाहायला मिळालं. हेच सत्य तो ईश्वरीलासुद्धा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र तो तिला अजूनही सांगू शकलेला नाही.

अशातच राकेशनं ईश्वरीच्या बाबांचा अपघात केला असून, त्यात त्यानं अर्णवला अडकवलं आहे. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव यांच्या मैत्रीत काहीसं अंतर निर्माण झालं आहे. अर्णवनेच आपल्या बाबांचा अपघात केला असल्याचं तिला वाटत आहे. त्यामुळे अर्णवची कोणतीच गोष्ट ती ऐकून घेण्यास तयार नाही.

मालिकेच्या कथानकात एकामागून एक ट्विस्ट येत असतानाच आता लोकप्रिय अभिनेत्रीची यातून एक्झिट झाली आहे. ती अभिनेत्री म्हणजे स्वाती चिटणीस. मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या स्वाती चिटणीस यांची एक्झिट झाली आहे. काल शुक्रवारी (५ सप्टेंबर) झालेल्या भागात स्वातींऐवजी आजीच्या भूमिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं.

तसेच सोशल मीडियावर मराठी मालिकांच्या अपडेट्स देणाऱ्या Marathi Serials Official या इन्स्टाग्राम पेजद्वारेसुद्धा याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. आता मालिकेत स्वाती चिटणीस यांच्या जागी अर्णवच्या आजी म्हणून अभिनेत्री वंदना पंडित यांची एन्ट्री झाली आहे. वंदना पंडित या मनोरंजन सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. याआधी त्यांनी काही मालिका व सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

वंदना पंडित यांनी ‘अष्टविनायक’ या सिनेमात सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यानंतर ‘मुक्ता’, ‘मणी’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्या झी मराठीवरील गाजलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतही पाहायला मिळाल्या होत्या. त्या मालिकेत त्यांनी सौमित्रच्या आईची भूमिका साकारली होती. आता त्या ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

दरम्यान, अलीकडेच ईश्वरीच्या आत्याची भूमिका साकारणाऱ्या संजीवनी साठे यांनी ही मालिका सोडली होती. त्यानंतर आता स्वाती चिटणीस यांचीसुद्धा मलिकेतून एक्झिट झाली आहे.