Tula Japnar Ahe Fame Mahima Mhatre Talks About Costar : ‘तुला जपणार आहे’ ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका आहे. सध्या या मालिकेत महत्त्वाचा ट्रॅक सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अथर्व-मीरामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. अशातच या दोघांनी एका मुलाखतीत एकमेकांबरोबरच्या ऑफस्क्रीन बॉंडबद्दल सांगितलं आहे.
अथर्व व मीरा म्हणजेच अभिनेता नीरज गोस्वामी आणि अभिनेत्री महिमा म्हात्रे यांनी नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी एकमेकांबरोबर असलेल्या ऑफस्क्रीन बॉंडबद्दल सांगितलं आहे. सध्या मालिकेत मीरा-अथर्व यांच्यामध्ये जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानिमित्तच त्यांना त्यांच्या ऑफस्क्रीन बॉंडबद्दलही विचारल्यानंतर त्यांनी सेटवर ते दोघे कसे असतात. सहकलाकार म्हणून एकमेकांना कशी मदत करतात याबद्दल सांगितलं आहे.
“आम्ही सेटवर एकमेकांशी फार बोलत नाही” – महिमा
मुलाखतीत नीरज महिमाबरोबरच्या ऑफस्क्रीन बॉंडबद्दल गंमत करीत म्हणाला, “खरं तर मला ही अजिबात आवडत नाही. हे फक्त मुलाखतीसाठी मी तिच्याशी बोलतोय.” हे ऐकून महिमा हसते आणि म्हणते, “विनोद पुरे झाला; पण आमचा ऑफस्क्रीन बॉंड खूप छान आहे. आमचं ऑफस्क्रीन जसं नातं असतं, तसंच स्क्रीनवर दिसतं किंवा अजून छान होतं. आम्ही सेटवर एकमेकांशी फार बोलत नाही. तोही त्याच्या कामात व्यग्र असतो आणि माझेही सतत सीन असतात. सीनच्या वेळी जास्तीत जास्त बोलणं होतं आणि सीनसंदर्भातच होतं. माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की, त्याला जर सीनमध्ये काही बदल करायचे असतील, तर ते मला कळतात आणि ते मान्यही असतात.”
महिमाबरोबरच्या बॉंडबद्दल नीरजची प्रतिक्रिया
नीरजबद्दल महिमा पुढे म्हणाली, “आम्ही सहकलाकार म्हणून एकमेकांना पाठिंबा देत असतो आणि आम्ही दोघेही खूप समजूतदार आहोत. फार नाही बोलणं होतं; पण सीन करताना जे काही होतं, ते छान असतं.” त्यावर नीरज महिमाची मस्करी करीत गमतीत म्हणतो, “मी बोलण्याचा प्रयत्न करतो; पण ती माझ्याशी बोलत नाही.” त्यावर महिमा हसते. पुढे नीरज, “आम्ही जास्त बोलत नाही; पण गरजेचं असतं ते बोलतो. हीसुद्धा बोलते मी फक्त मस्करी करतोय,” असं म्हणतो.
दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत सध्या महत्त्वाचं वळण आलं असून, मीरा सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यचा प्रयत्न करताना दिसते आणि अथर्वही तिला त्यासाठी पाठिंबा देतो. परंतु, सध्या मीरा त्याला काहीच सांगू शकत नसल्यानं त्याला ती गोंधळल्यासारखी का वागत आहे यामागचं कारण कळत नसतं. त्यामुळे ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.