Tula Japnar Ahe Fame Actress Shared Struggle Story : कलाकार म्हटलं की, संघर्ष हा आलाच. विशेषकरून जेव्हा ते त्यांच्या तत्वांनुसार काम करीत असतात. अनेक जण याबद्दल मुलाखतीतूनही सांगत असतात. अशातच ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील अभिनेत्रीनंही तिच्या संघर्षकाळाची माहिती दिली आहे.
कलाकारांच्या बाबतीत ‘आज काम आहे, तर उद्या नाही’, असं अनेकदा होताना दिसतं. अशातच ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला जपणार आहे’मध्ये मंजिरी हे महत्त्वपूर्ण पात्र साकारणारी अभिनेत्री शर्वरी लोहकरेनं एक वेळ अशी होती जेव्हा तिच्याकडे कुठलंच काम नव्हतं याबद्दल सांगितलं आहे.
शर्वरी लोहकरेची प्रतिक्रिया
शर्वरीनं ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं याबद्दल सांगितलं आहे. तिला यामध्ये आयुष्यामध्ये कधी हरल्यासारखं वाटलं का, महिलांना विशेषकरून असं वाटतं की, तुझा अनुभव कसा आहे, असं विचारण्यात आलेलं. त्यावर ती म्हणाली, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात तसं एक वळण येतंच आणि ते म्हणजे काम नसणं. करिअरच्या सुरुवातीपासून मला जे काम आवडत आलेलं आहे त्याचीच निवड केली आहे. त्यामुळे कदाचित सुरुवातीच्या काळात माझं ते तत्त्व मला फायद्याचं ठरलं नाही आणि दोन-तीन वर्षं मी अभिनयापासून लांब होते.”
शर्वरी पुढे म्हणाली, “मी त्यावेळी अभिनयापासून जरी लांब असले तरी सूत्रसंचालन अशा काही गोष्टी करीत होते. पण, अभिनय क्षेत्रात मला जे काम करायचं होतं, ते मला नाही करायला मिळालं. ती वेळ खूप काही शिकवणारी होती. तेव्हा माझी आई, मैत्रिणी या सगळ्या जणी माझ्या पाठीशी उभ्या होत्या. त्यामुळे मला खचल्यासारखं वाटलं नाही; पण नवीन गोष्टी शिकत राहिल्या पाहिजे याची जाणीव झाली.”
दरम्यान, शर्वरी लोहकरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं ‘निवेदिता माझी ताई’, ‘तुमची मुलगी काय करते’, ‘खट्टा मिठ्ठा’, ‘सूर्यवंशी’ अशा कलाकृतींमध्ये काम केलं आहे. आता ‘तुला जपणार आहे’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळतेय.