Hrishikesh Shelars Wife Shares Special Post: अभिनेता हृषिकेश शेलार याने खलनायक व नायक अशा दोन्ही रुपांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. विशेष बाब म्हणजे त्याच्या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांचे मोठे प्रेमही मिळाले.
हृषिकेश शेलार ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या मालिकेत त्याने साकारलेली दौलत ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत दिसला. नायक म्हणून त्याची ही पहिली मालिका होती.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत त्याने अधिपती ही भूमिका साकारली होती. या भूमिकेतून घराघरांत पोहोचला. आईवरचे प्रचंड प्रेम व विश्वास, पत्नीप्रतिचे समर्पण, वडिलांविषयी मनात असलेली कटुता आणि अन्यायाप्रति असलेली चीड अशी ही अधिपतीची भूमिका लोकांना प्रचंड आवडली. मास्तरीणबाई व अधिपती यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या मालिकेने नुकताच निरोप घेतला आहे.
आता अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याला लग्नाला आज ८ वर्षे पूर्ण झाले आहे. या निमित्ताने त्याने व त्याच्या पत्नीने त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असलेले फोटो पाहायला मिळत आहेत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याच्या पत्नीची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
हे फोटो शेअर करताना अभिनेत्याच्या पत्नीने स्नेहाने दिलेले कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. स्नेहाने हृषिकेशला उद्देशून लिहिले, “आपल्या या प्रवासाला ८ वर्षे झाली. आपण आजच्या युगातले आहोत. पण, तरीही स्वभावाने ९०च्या काळात रमतो. ७० आणि ८० च्या दशकातील गाणी आपल्याला फार जवळची वाटतात. ब्लॅक अँड व्हाईट गाण्यांबरोबर असंच रंगीबेरंगी आयुष्य जगूया.”
“आता तर आपलं आयुष्य रुहीच्या अवतीभोवती फिरतंय. अशीच एकमेकांना साथ देत, प्रोत्साहन देत हे सुंदर आयुष्य एकमेकांसमवेत घालवूयात. लव्ह यू. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” स्नेहाच्या या पोस्टवर अभिनेत्री शिवानी रांगोळेने कमेंट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. तर हृषिकेशनेदेखील स्नेहाबरोबरचे काही फोटो शेअर करीत एकमेकांबरोबरची ८ वर्षे अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, अभिनेता ‘शिकायला गेलो एक’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामध्ये त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. आता आगामी काळात अभिनेता कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.