अभिनेते स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) हे सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत काम करीत आहेत. या मालिकेत ते चारुहासची भूमिका साकारत आहेत. अधिपतीचे वडील व अक्षराचे सासरे, अशी भूमिका ते साकारत आहेत. भुवनेश्वरी व चारुलता यांच्यामध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वाद होताना दिसतो. त्यांच्यातील भांडणांमुळे अक्षरा व अधिपती यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. चारुहास मात्र नेहमी अक्षराच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसते. आता मात्र अभिनेते त्यांच्या भूमिकेमुळे नाही, तर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ते चर्चेत आले आहेत.

स्वप्नील राजशेखर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक रील शेअर केली आहे. एन्ना सोल्ला (Enna Solla) या ट्रेडिंग गाण्यावर त्यांनी त्यांच्या मुलांबरोबर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा मुलगा व मुलगी दोघेही यामध्ये आनंदाने सहभागी झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी, ‘मैं और मेरे बच्चे’, अशी कॅप्शन देत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत आहे. स्वप्नील राजशेखर यांना त्यांच्या मुलांबरोबर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी?

स्वप्नील राजशेखर यांच्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत; तर काहींनी त्यांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने, “एवढी मोठी मुलं आहेत तुम्हाला? बालविवाह झाला होता का?”, असे विचारत पुढे हसण्याची इमोजी शेअर केली. त्यावर स्वप्नील राजशेखर यांनी त्याला उत्तर देत “हो” असे गमतीत म्हटल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “सॉरी सर; पण आम्ही तुम्हाला गणोजी शिर्के म्हणूनच ओळखतो”, या कमेंटलासुद्धा स्वप्नील राजशेखर यांनी इमोजी शेअर करीत रिप्लाय दिला आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “आमचा कोल्हापूरचा सलमान खान आहे.” एका नेटकऱ्याने, “मला अस वाटतंय की, हा माणूस एवढा सुंदर असून खलनायकाच्या भूमिका का साकारत असेल? लव्ह यू स्वप्नील सर”, असे म्हणत स्वप्नील राजशेखर यांचे कौतुक केले आहे.

इतर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “कोल्हापूरचे एव्हरग्रीन हीरो. संतूर डॅड”, “खूप छान स्वप्नीलजी. तुम्ही खूप मस्त आहात”, “आजपर्यंत फक्त संतूर मम्मी बघितल्या; पण आज पहिल्यांदा संतूर पप्पा बघतोय”, “संतूर आईचं नसते; तर बापसुद्धा असतो”, “चिरतरुण”, “एकदम कडक दादा”, “दादा, मुलं नाही भांवंडं वाटतात.”

स्वप्नील राजशेखर यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह हृषिकेश शेलार व शरयू सोनावणे यांनीदेखील कमेंट्स करीत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्वप्नील राजशेखर हे त्याच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. ‘राजा शिवछत्रपती’, ‘कुलस्वामिनी’, ‘खेळ मांडला’, अशा मालिका व चित्रपटांतून त्यांनी कामे केली आहेत. अभिनेते सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. विविध विषयांवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंत पडत असल्याचे दिसते.