Usha Nadkarni Slams Trollers : उषा नाडकर्णी मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. उषा या नेहमी त्यांची मतं, प्रतिक्रिया ठामपणे मांडत असतात. अशातच आता त्यांनी मराठी इंडस्ट्रीविषयीचं त्यांचं मत मांडलं आहे.

उषा यांनी ‘माहेरची साडी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. अशातच या चित्रपटातील सर्व कलाकार एकत्र आले असून त्यांनी यावेळी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यावेळी उषा यांनी मराठी इंडस्ट्रीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये उषा यांनी त्या गेली अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्या जे बोलतात ते खरं असतं आणि त्यांचं काम चांगलं आहे, म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही त्या मराठीसह हिंदीतही काम करत असल्याचं म्हटलं आहे.

उषा नाडकर्णी यांची प्रतिक्रिया

उषा मुलाखतीत म्हणाल्या, “आता मी मुद्दामच बोलतेय कारण आता माझं वय झालंय. मी कधीही गचकेन, म्हणून त्याच्याआधी बोलून घेते. आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाबद्दल जर चांगलं बोललं गेलं तर लोकांचा खूप जळफळाट होतो आणि हे लोक माझ्याबद्दल बोलतात. पण, त्या नालायक लोकांना का कळत नाही की मी जर वाईट असते, मी कोणाला छळलं असतं, त्यांना एवढी अक्कल नाही की आज या बाईची पंचात्तरी होऊन गेली, ती एवढी वर्ष काम करतेय, आजही काम करतेय, याचा अर्थ ती कोणाला त्रास देत नाही.”

उषा पुढे म्हणाल्या, “लोकांना ज्यांना कामं नाही, जे फक्त मला कोण बोलवेल म्हणत वाट बघत असतात; मी तर तेही करत नाही. माझा कोणी पीआर नाही, कोणी मॅनेजर नाही, मला हिंदीतही काम मिळतं, मराठीतही काम मिळतं. अजून मी काम करतेय.” उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मला लता बाईंनी मास्टर शेफच्या वेळी फोन केला आणि म्हणाल्या, उषा ते लोक तुला किती प्रेम करतात, असं आपल्या मराठीत का नाही? मी म्हटलं, बाई मराठीत कामं नाही मिळत मग उभ्या उभ्या तिकडे बसायचं आणि मग ती अशी आहे तशी आहे असं बोलत बसायचं.”

उषा नाडकर्णी याबद्दल पुढे म्हणाल्या, “मी पुण्यात दागिन्यांची एक जाहिरात केली. तिथे तो माणूस म्हणाला, तुम्ही काहीच मागितलं नाही; तर मी म्हटलं, माझ्या आई-बाबांनी मला भीक मागायला शिकवलं नाही, मी माझं काम झालं पॅकअप झालं की निघते; तर तो म्हणाला दोन जणं आहेत पुण्यातली, त्यांनी तुम्हाला काम देऊ नको असं सांगितलेलं. मी म्हटलं मी काम केलंय त्या लोकांबरोबर. पण, तो म्हणाला नाही तरी ते म्हणालेत असं. मग मी म्हटलं मी काम केलं आहे त्या लोकांबरोबर आणि तरी ते असं बोलले असतील तर याचा अर्थ मी नक्कीच मोठी झाले आहे, कारण मोठ्या लोकांबद्दल मागून बोललं जातं.”