Vaishnavi Kalyankar Talk’s About Married Life : अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांनी डिसेंबर २०२४ ला लग्न केलं होतं. दोघांचा प्रेमविवाह आहे. लग्नानंतर दोघेही लगेच कामावर रुजू झाले. अशातच आता वैष्णवीने लग्नानंतरच्या त्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे.

वैष्णवी ‘घाबडकुंड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त तिने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यावेळी अभिनेत्रीला तिच्या संसाराबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल वैष्णवी म्हणाली, “खूप छान सुरू आहे.” पुढे ती गंमत करत म्हणाली “त्याचा तिकडे चालू आहे, माझा इकडे चालू आहे. सातारा आणि पुणे सुरू आहे.”

वैवाहिक जीवनाबद्दल वैष्णवी कल्याणकरची प्रतिक्रिया

वैष्णवी पुढे म्हणाली, “लग्नानंतर आम्ही थोडाच काळ एकत्र होतो, त्यानंतर ‘देवमाणूस’ सुरू झालं आणि आमचं लाँग डिस्टन्स सुरू झालं. लग्नाआधीही लाँग डिस्टन्स आणि लग्नानंतरही लाँग डिस्टन्स सुरू आहे.” यामध्ये तिला तू संसारात रमलीयेस का असं विचारल असताना, वैष्णवी म्हणाली, “बऱ्यापैकी रमली आहे, कारण लग्न झाल्यानंतर ४-५ महिने एकत्र राहिलो.”

वैष्णवीला पुढे चित्रपटातील भूमिकेबद्दल किरणची काय प्रतिक्रिया होती याबद्दल विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, “माझ्याआधी त्यालाच या चित्रपटाबद्दल समजलेलं, नंतर मला कळलं. पण, जसं मला या चित्रपटाबद्दल समजलं, तेव्हा मी पटकन हो म्हटलं, कारण या चित्रपटातील भूमिका खूप वेगळी आहे.”

वैष्णवी व किरण गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी त्यांच्या लग्नाची बातमी प्रेक्षकांना सांगत त्यांना सुखद धक्का दिला होता. वैष्णवीनेही ‘देवमाणूस’ मालिकेच्या याआधीच्या पर्वात किरण गायकवाडसह काम केलं आहे.

दरम्यान, वैष्णवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने आजवर मालिका तसेच चित्रपटांतही काम केलं आहे. वैष्णवीने ‘झी मराठी’वरील ‘तू चाल पुढे’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यानंतर तिने ‘सन मराठी’वरील ‘तिकळी’ मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारलेली. यासह तिने ‘बांबू’ व ‘सिंगल’ या चित्रपटांत काम केलं आहे आणि आता ती ‘घबाडकुंड’ चित्रपटातून झळकणार आहे