Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रेक्षकांना आता समर-स्वानंदीचा ग्रँड लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. आधिरा आणि रोहन यांच्यावरच्या प्रेमापोटी समर-स्वानंदी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. आता त्यांचा हा नवा प्रवास कसा सुरू होणार, यामध्ये कोणते ट्विस्ट येणार याची सर्व चाहत्यांना आतुरता आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत एक नाही तर दोन लग्न होणार आहेत…पहिलं आधिरा-रोहनचं आणि दुसरं समर-स्वानंदीचं. या खास लग्न सोहळ्याचं चित्रीकरण करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम गोव्याला दाखल झाली आहे. ज्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक नवा रंग मिळाला आहे. दक्षिण गोव्याच्या आलिशान फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
समुद्रकिनारी लग्न हा आगळावेगळा प्रयोग पहिल्यांदाच मराठी मालिकाविश्वात करण्यात येईल. प्रेक्षकांना पहिल्यांदाच गोव्यातील आलिशान रेस्टॉरंटमध्ये पार पडणारं ग्रँड वेडिंग पाहायला मिळेल.
समुद्रकिनारी असलेला सुंदर मंडप, कलाकारांचे भरजरी व आकर्षक पोशाख हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. आधिरा आणि रोहन यांची प्रेमकहाणी आणि समर-स्वानंदीने भावंडांवरच्या प्रेमापोटी घेतलेला भावनिक निर्णय यामुळे आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. भावंडांच्या प्रेमासाठी समर-स्वानंदीने घेतलेला हा निर्णय पुढे त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
सध्या समर-स्वानंदीची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजवाडे आणि सरपोतदार या कुटुंबीयांनी आयोजित केलेला हा भव्यदिव्य लग्नसोहळा २९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.
महाविवाह सोहळा…
- २९ ऑक्टोबर – मुहूर्तमेढ
- ३०-३१ ऑक्टोबर – मेहंदी सोहळा
- १-२ नोव्हेंबर – चुडा भरणं
- ५-६ नोव्हेंबर – हळद
- ७ नोव्हेंबर – सीमांत पूजन
- ८-११ नोव्हेंबर – विवाहसोहळा
अशाप्रकारे प्रेक्षकांना हा भव्यदिव्य लग्नसोहळा ‘झी मराठी’ वाहिनीवर ११ नोव्हेंबरपर्यंत रोज सायंकाळी ७:३० वाजता पाहायला मिळणार आहे.
