Subodh Bhave Praises Tejashri Pradhan : सुबोध भावे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिका, चित्रपटांत काम केलं आहे. सध्या तो ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्यासह मुख्य भूमिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानही झळकत आहे. अशातच आता त्याने त्याची सहकलाकार तेजश्रीबद्दल नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

सुबोध व तेजश्री ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदी आणि समर या भूमिका साकारत आहेत. अशातच सुबोधने नुकतीच ‘झी मराठी पुरस्कार २०२५’निमित्त ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने वाहिनीवरील त्याच्या मालिकांबद्दल सांगितलं आहे. सुबोध म्हणाला, “२५ वर्ष झाली मला इकडे येऊन. झी मराठीवरची ही माझी १९वी मालिका आहे आणि १९ अप्रतिम व्यक्तिरेखा मला यामार्फत मिळाल्या.”

सुबोध भावेने केलं तेजश्री प्रधानचं कौतुक

सुबोध मालिकांमधील भूमिकांबद्दल म्हणाला, “मला फार मजा आली या व्यक्तिरेखा सादर करताना आणि वेगवेगळ्या सहकलाकारांबरोबर काम करताना.” सुबोधला पुढे तेजश्रीबरोबरच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “अतिशय गुणी, शिस्तप्रिय, स्वत:च्या कामावर फोकस असलेली अशी ती आहे.”

तेजश्रीचं कौतुक करत सुबोध पुढे म्हणाला, “ती नुसती येऊन संवाद पाठ करत नाही तर मालिकेत आधी काय घडलंय, सीनमधील कन्टीन्युटी या सगळ्याकडे तिचं लक्ष असतं. छोट्या छोट्या गोष्टी, सेटवरील तिची शिस्त आणि मालिकेला स्वत:चं १०० टक्के देणाऱ्या कलावंताबरोबर काम करताना मला स्वत:ला पुन्हा एकदा नव्याने शिकायला मिळतंय आणि उत्तम कलाकाराबरोबर काम करण्याचं समाधान आहे.”

तेजश्री प्रधान व सुबोध भावे पहिल्यांदाच मालिकेतून एकत्र झळकत आहेत. यापूर्वी त्यांनी चित्रपटातून एकत्र काम केलं. आहे. या मालिकेतील त्यांच्या स्वानंदी व समर या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, सुबोध भावेबद्दल बोलायचं झालं तर सुबोध सध्या या मालिकेत काम करत असून नुकताच १० ऑक्टोबर रोजी त्याचा ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्यासह मानसी नाईक पाहायला मिळते. तर येत्या काळात सुबोध नीम करोरी बाबा यांच्यावर आधारित चित्रपटातून झळकणार आहे.