अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आजपर्यंत अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी-हिंदी मालिका, चित्रपट यांमध्ये काम करीत त्यांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी आजवर खलनायिकेच्या तसेच विनोदी अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. फक्त मराठीतूनच नव्हे, तर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम करीत त्यांनी हिंदी प्रेक्षकांनाही भुरळ घातली. ‘पवित्र रिश्ता’मध्ये त्यांनी सविता देशमुख ही भूमिका साकारली होती. ही त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक आहे. परंतु, ही भूमिका त्यांना कशी मिळाली यामागेही एक किस्सा आहे.

उषा यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. नुकतीच उषा यांनी ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांना “आजही तुम्ही सविताताई या नावाने ओळखल्या जाता. सविताताई एक भावना आहे; पण त्यादरम्यानच्या कोणत्या आठवणी आहेत, ज्या आजही तुम्हाला आठवतात.” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “माझी ती भूमिका खूप वेगळी होती. ती गरीब होती, भांडखोर होती, भावनिक होती. तिच्या मुलांवर खूप प्रेम करणारी होती. खूप चांगली भूमिका होती. मला अशा भूमिका साकारायला खूप आवडतात. माझी आवडती भूमिका आहे ती.” असं त्यांनी म्हटलं आहे.

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, “मी बालाजीच्या ‘थोडी सी जमीन थोडा सा आसमान,’ ‘कुछ इस तरह’ या मालिकांमध्ये काम केलं होतं आणि त्यानंतर मला ‘पवित्र रिश्ता’साठी विचारणा झाली. माझं ‘थोडी सी जमीन थोडा सा आसमान,’ ‘कुछ इस तरह’ या मालिकांसाठी ऑडिशन घेतलं गेलं नाही; पण एवढं काम केल्यानंतरही ‘पवित्र रिश्ता’साठी मला दीड पानांचा सीन करायला सांगितला. त्यामुळे मला ऑडिशनसाठी बोलावलं तेव्हा खूप राग आला होता. पण, माझ्याकडे तेव्हा काही काम नव्हतं. त्यामुळे कुठळाच पर्याय नव्हता. म्हणून मी ती ऑडिशन दिली आणि मला मालिका मिळाली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पवित्र रिश्ता’ ही मालिका हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका होती. त्यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे व दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हे दोघे मुख्य भूमिकांत होते. त्यांनी अर्चना व मानव या भूमिका साकारल्या होत्या. उषा यांनी मानवच्या आईची भूमिका साकारली होती. अर्चना व मानव त्या काळी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. या जोडीला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अजूनही प्रेक्षक या मालिकेला विसरलेले नाहीत.