Chala Hawa Yeu Dya Show : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी येत्या १३ सप्टेंबरला ८० वर्षांच्या होणार आहेत. ‘सिंहासन’, ‘पक पक पकाक’, ‘देऊळ’, ‘माहेरची साडी’, ‘धमाकेदार’ अशा बऱ्याच गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. उषा नाडकर्णींनी ‘पवित्र रिश्ता’, ‘खुलता कळी खुलेना’ अशा मालिकांमध्येही काम केलेलं आहे. त्यांचा दमदार अन् डॅशिंग अंदाज कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्यांना प्रेमाने ‘आऊ’ म्हणतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतंच त्यांना ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने खास सरप्राइज दिलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी नुकतीच ‘झी मराठी’च्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी शोमधल्या सगळ्या कलाकारांनी मिळून त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला. याचा खास प्रोमो वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये या आठवड्यात गणेशोत्सव विशेष भाग साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शोमध्ये दोन लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री एन्ट्री घेणार आहेत. त्यांची नावं आहेत अलका कुबल आणि उषा नाडकर्णी.
‘चला हवा येऊ द्या’चा सूत्रसंचालक अभिषेक खांडकेकर यावेळी म्हणतो, “OG गँगस्टर ऑफ इंडस्ट्री…म्हणजेच सर्वांच्या लाडक्या उषा नाडकर्णी. ही तरुणी येत्या १३ सप्टेंबरला ८० वर्षांची होतेय.” यानंतर आऊला मंचावर आमंत्रित केलं जातं. अलका कुबल आणि श्रेया बुगडे या दोघीजणी त्यांचं औक्षण करतात, त्यांना साडी भेट देतात. अशाप्रकारे सर्वांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होतोय हे पाहून उषा नाडकर्णी यांचे डोळे पाणावतात.
उषा नाडकर्णी म्हणतात, “तुम्ही सगळ्यांनी माझ्याबद्दल जे प्रेम दाखवलं…मी खरंच भारावून गेले. मला मनापासून खरंच भरून आलंय, वाईट वाटतंय.” याशिवाय त्यांनी या सुंदर सरप्राइजसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या संपूर्ण टीमचे देखील आभार मानले आहेत.
दरम्यान, उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस-विशेष भाग प्रेक्षकांना येत्या शनिवार-रविवारी ‘झी मराठी’वर रात्री ९ वाजता ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहता येणार आहे.