Vin Doghantali Hi Tutena : तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका येत्या ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तेजश्रीसह लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसेल. मात्र, या मालिकेत सुबोध-तेजश्रीसह आणखी बरेच लोकप्रिय कलाकार आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या स्टारकास्टबद्दल जाणून घेऊयात…
‘झी मराठी’ वाहिनीवर जवळपास १ वर्ष अधिराज्य गाजवल्यावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. एजे-लीलाच्या लव्हस्टोरीला अल्पावधीतच खूप प्रेम मिळालं. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता लवकरच ‘नवरी मिळे हिटलरला’मधील बहुतांश कलाकारांना प्रेक्षकांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील चार लोकप्रिय कलाकार तेजश्रीच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत झळकणार आहेत. यापैकी पहिला अभिनेता आहे राज मोरे. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये राजने विराज जहागीरदार ही भूमिका साकारली होती. आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून राज एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नव्या सिरियलमध्ये अभिनेता तेजश्री प्रधानच्या म्हणजेच स्वानंदीचा भाऊ रोहन दिलीप सरपोतदारची भूमिका साकारणार आहे.
नव्या मालिकेत कोण साकारणार तेजश्री प्रधानच्या आईची भूमिका?
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत राज मोरेसह भारती पाटील, शर्मिला शिंदे, सानिका काशीकर या अभिनेत्री देखील झळकणार आहेत. भारती पाटील या नव्या सिरियलमध्ये तेजश्रीच्या आईची भूमिका साकारणार आहेत; मंदाकिनी दिलीप सरपोतदार असं त्यांच्या भूमिकेचं नाव असेल. लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला शिंदे यामध्ये नेमकं कोणतं पात्र साकारणार याबद्दल अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, प्रेक्षक तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या, किशोरी अंबिये, पूर्णिमा डे, किशोर महाबोले, अपूर्वा सकपाळ, हरीश थोरात, अक्षता नाईक, आशय कुलकर्णी हे कलाकार देखील नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.