Yed Lagala Premach Promo : ‘येड लागलं प्रेमाचं’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा बिरारी यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच यात अभिनेता शंतनू मोघेची एन्ट्री झाली, तर नुकतीच या मालिकेत अभिनेत्री एकता लबदेदेखील पाहायला मिळाली.

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत एकता लबदेची एन्ट्री झालेली पाहायला मिळते. एकता मालिकेत रखुमाईच्या रुपात येऊन रायाला मदत करते, पण त्याला भेटलेली ती व्यक्ती साक्षात रखुमाईच आहेत याची जाणीव त्याला उशिरा होते. परंतु, त्यांच्यामुळे त्याला मंजिरीच्या भावाने शंतनूने दिलेलं आव्हान पूर्ण करण्यास मदत मिळते, असं मालिकेत पाहायला मिळालं

राया घेणार नरसिंहाचा अवतार

शंतनूने रायाला स्वकष्टाने पैसे जमा करण्याचं आव्हान दिलं होतं, जे त्याने पूर्ण करू नये यासाठी जय कुठल्या न कुठल्या अडचणी रायासमोर उभ्या करत होता. पण, तरीही रायाने शंतनूने दिलेलं आव्हान पूर्ण केलं. मात्र, तो ते पैसे घेऊन शंतनूकडे अजून गेलेला नाही, त्यामुळे शंतनूकडे जाईपर्यंत जय रायाला अडचणीत आणण्यासाठी नवीन कट रचणार का हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेलं. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करत त्याला “नरसिंहाचा अवतार घेऊन राया करणार त्याच्या माणसांचं रक्षण…” अशी कॅप्शन दिली आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये जय रायाला म्हणतो, “राया तुझा अवतार संपणार, मंजिरीच काय तुझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा माझा माणूस चिथड्या उडवणार” यानंतर पुढे राया “मी असताना बघतोच कोण लावतोय माझ्या माणसासनी धक्का,” असं म्हणतो.

पुढे प्रोमोत कीर्तन सुरू असलेलं दिसतं. त्यानंतर रायाने नरसिंहाचं रूप धारण केलेलं दिसतं आणि तो त्यावेळी “तू माझ्या माणसासनी बॉम्बनी उडवणार, आता ह्यो राया तुला आडवा फाडणार” असं म्हणतो. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत येत्या १३-१४ ऑक्टोबरला हा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.