Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Sonali Verma : ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’मध्ये गायत्री हे महत्त्वपूर्ण पात्र साकारत घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे सोनाली वर्मा. परंतु तुम्हाला माहीत आहे का, सोनाली वर्मा अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी वृत्त निवेदिका म्हणून काम करायच्या. तर आता त्यांनी अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला असून त्या परदेशात स्थायिक झाल्या आहेत.
सोनाली वर्मा यांनी या मालिकेत हिना खानच्या सासुबाईंची म्हणजेच गायत्री सिंघानिया ही भूमिका साकारलेली. परंतु, २०१३ मध्ये त्यांच्या पात्राचा मालिकेत शेवट झाला आणि त्यांनी या मालिकेतून निरोप घेतला. मालिकाविश्वात पदार्पण करण्याआधी त्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये वृत्त निवेदिका म्हणून काम करायच्या. चला तर जाणून घेऊयात वृत्त निवेदिका ते अभिनेत्री हा त्यांचा प्रवास कसा होता आणि सध्या त्या काय करत आहेत.
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार सोनाली पत्रकार होत्या आणि त्यांनी तब्बल दहा वर्ष वृत्त निवेदिका म्हणून काम केलेलं, तर त्यांनी कधीही अभिनयक्षेत्राबद्दल विचारही केला नव्हता. परंतु म्हणतात ना, जे नशिबात लिहिलेलं असतं ते घडतंच, तसंच काहीसं सोनाली यांच्याबरोबर झालं आणि एक दिवस त्यांची भेट अभिनेते जितेंद्र कपूर यांच्याशी झाली, ज्यांनी नंतर सोनाली यांची ओळख त्यांची लेक एकता कपूरबरोबर करून दिली. एकताला भेटल्यानंतर सोनालीचं आयुष्यच जणू बदलून गेलं आणि तिच्या टेलिव्हिजनवरील प्रवासाला सुरुवात झाली.
मालिकेचा घेतला निरोप
२०१३ मध्ये सोनालीने ‘यह रिश्ता क्या केहलाता हैं’ मालिकेतून निरोप घेतला, त्यावेळी मालिकेत तिचा अपघात झाल्याने तिच्या पात्राचा प्रवास थांबतो असं पाहायला मिळालं. त्यानंतर तिने सचिन सचदेवबरोबर लग्न केलं आणि अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला.
सोनाली वर्मा सध्या काय करत आहे?
सोनाली सध्या न्यू जर्सी यूएसएमध्ये राहत असून ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरी सध्या ती तिचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल चालवत आहे. ती परदेशात तिच्या नवऱ्याबरोबर व मुलाबरोबर राहत आहे.
