Zee Marathi Awards Show & Star Pravah Dhinchak Diwali 2025 – मराठी टेलिव्हिजनविश्वात ‘झी मराठी’ व ‘स्टार प्रवाह’ या दोन्ही वाहिन्या सध्याच्या घडीला आघाडीवर आहेत. जास्तीत जास्त टीआरपी मिळवण्यासाठी या दोन्ही मालिकांमध्ये चुरस रंगलेली असते. गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या यादीत ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळत आहे. तर, ‘झी मराठी’वरील नवनवीन विषयांवरील मालिकांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय.
यंदा १२ ऑक्टोबरला दिवाळीनिमित्ताने या दोन्ही वाहिन्यांवर विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘झी मराठी’ वाहिनीवर मालिकांचा पुरस्कार सोहळा पार पडला. तर, ‘स्टार प्रवाह’वर ढिंचॅक दिवाळी २०२५ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
पुरस्कार सोहळा ११ आणि १२ ऑक्टोबर असे दोन दिवस प्रसारित करण्यात आला. मात्र, १२ ऑक्टोबरला हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी ऑन एअर झाले. त्यामुळे यादिवशी कोणत्या सोहळ्याला चांगला टीआरपी मिळाला? याबद्दल जाणून घेऊयात…
स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी या कार्यक्रमाला आतापर्यंतचं सर्वाधिक ३.३ इतकं टीआरपी रेटिंग मिळालं आहे. तर, झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्याला १२ ऑक्टोबरला २.३ रेटिंग मिळालंय. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत बारा तारखेला ढिंचॅक दिवाळीने बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आहे.
यंदा ढिंचॅक दिवाळीमध्ये प्रेक्षकांना आवडत्या कलाकारांची धमाल मस्ती, हटके स्किट आणि कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. निलेश साबळे आणि भाऊ कदम या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते.
तर, झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात विजेत्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राप्ती रेडकर, किरण गायकवाड, हर्षदा खानविलकर, प्रसाद जवादे या कलाकारांचे कुटुंबीय त्यांना सरप्राइज देण्यासाठी मंचावर आले होते.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या टीआरपी यादीवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी झी मराठी पुरस्कार सोहळ्याचा दोन्ही भागांचा टीआरपी एकत्र केल्यास आकडेवारी जास्त येईल असं म्हटलं आहे. तर, काही चाहत्यांनी ढिंचॅक दिवाळी शोचं कौतुक केलं आहे.
