Zee Marathi Chal Bhava Cityt Finale Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. टीआरपीच्या दृष्टीकोनातून आता वाहिनीवर अनेक बदल करण्यात येत आहे. या वाहिनीवरच्या दोन लोकप्रिय मालिकांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या दोन्ही मालिकांचे अखेरचे भाग एकाच दिवशी म्हणजेच २५ मे रोजी प्रसारित करण्यात आले. आता या पाठोपाठ वाहिनीवरचा एक लोकप्रिय कार्यक्रम सर्वांचा निरोप घेणार आहे.

‘झी मराठी’चा लोकप्रिय रिऍलिटी शो ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमात १ जून रोजी महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात शोच्या विजेत्याची घोषणा केली जाईल आणि श्रेयस तळपदे होस्ट करत असलेला हा लोकप्रिय शो प्रेक्षकांचा निरोप घेईल.

‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याची झलक नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली. यावेळी गावरान ब्रोजना शुभेच्छा देण्यासाठी ‘अंधार माया’ या Zee 5 च्या थ्रिलर वेब सीरिजच्या कलाकारांची टीम उपस्थित राहिली होती. तसेच ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड देखील या कार्यक्रमात खास परफॉर्मन्स सादर करत त्याच्या नव्या मालिकेची माहिती सर्वांना देणार आहे.

‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका येत्या २ जूनपासून रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत यंदा प्रेक्षकांना ‘देवमाणूस’सह ‘रात्रीस खेळ चाले’ फेम ज्येष्ठ अभिनेते अण्णा नाईकांची जुगलबंदी पाहायला मिळेल. याशिवाय ‘चल भाव सिटीत’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्री वल्लरी विराज ( लीला ) देखील जबरदस्त परफॉर्मन्स सादर करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा १ जून रोजी रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जाईल. अंतिम फेरीत एकूण पाच स्पर्धकांच्या जोड्या पोहोचल्या आहेत. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.