Chala Hawa Yeu Dya New Season : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने २०१४ ते २०२४ या १० वर्षांच्या काळात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. गेल्यावर्षी ( मार्च २०२४ ) या कार्यक्रमाने काही महिन्यांसाठी सर्वांचा निरोप घेतला होता. यावेळी शोमध्ये काम करणारे सगळेच कलाकार भावुक झाले होते. मात्र, आता छोट्या ब्रेकनंतर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा नवा सीझन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज होत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच प्रोमो शेअर करत ‘चला हवा येऊ द्या’चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं जाहीर केलं होतं. त्यानुसार, आता या कार्यक्रमाची वेळ आणि नव्या पर्वाच्या शुभारंभाची तारीख जाहीर करण्यात आली होती.
‘चला हवा येऊ द्या’च्या गेल्या सीझनमध्ये जवळपास १० वर्षे डॉ. निलेश साबळेने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. मात्र, आता नव्या सीझनमध्ये लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. त्याच्यासह अनेक दमदार कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
श्रेया बुगडे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे या कलाकारांची वर्णी ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात लागली आहे. हा नवीन सीझन २६ जुलैपासून सुरू होत आहे.
२६ जुलैपासून शनिवारी आणि रविवारी रात्री ९.३० वाजता हा शो ऑन एअर होणार आहे. “कॉमेडीचं गँगवॉर गाजणार, महाराष्ट्र आता खळखळून हसणार” अशी पोस्ट शेअर करत ‘झी मराठी’ने नव्या शोच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांसह मालिकाविश्वातील कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ हा शो सुरू झाल्यावर ‘झी मराठी’वर महत्त्वपूर्ण बदल करण्यात येतील. हा शो शनिवार आणि रविवारी रात्री ९.०० वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या ९.०० वाजता सुरू असणाऱ्या ‘कमळी’ आणि साडेनऊ वाजताच्या ‘शिवा’ मालिकेच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. ‘कमळी’ आणि ‘शिवा’ या मालिका शनिवार-रविवार वगळून फक्त सोमवार ते शुक्रवार प्रसारित केल्या जाऊ शकतात.
दरम्यान, पियुष रानडे, सुयश टिळक, शर्मिला शिंदे, प्रसाद जवादे, रेश्मा शिंदे, सिद्धार्थ बोडके, गिरिजा प्रभू, क्षितीश दाते, स्वानंदी बेर्डे, तेजस्विनी लोणारी, मयुर पवार, ओमकार जाधव अशा बऱ्याच कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.